ठाणे - सध्या खरीप हंगाम लक्षात घेता शेती व पशुधनाची खरेदी विक्री सुरू होणे आवश्यक आहे. यामुळे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुरांचा बाजार सुरू करण्याबाबत मागण्यात आलेल्या परवानगीच्या अनुषंगाने बाजार समितीच्या आवारात गुरांचा बाजार सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे.
मात्र, कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर, सदर ठिकाणी विक्रेत्यांना बसण्यासाठी तसेच नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी गोल/चौकोनाची आखणी करणे आवश्यक आहे. प्रवेशद्वारावर तसेच ये-जा करण्याच्या ठिकाणी व सामायिक जागेत थर्मल स्क्रिनींग व हॅन्डवॉशची व्यवस्था करणे, आवारात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे व गर्दी टाळणे बंधनकारक राहील. गुरांचा बाजार दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार असून दर रविवारी बंद राहिल याची दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच आठवड्यातून दोन वेळा समितीच्या आवाराचे निर्जंतुकीकरण करणे देखील आवश्यक राहील. या अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यास सदर परवानगी रद्द करण्यात येईल, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी निर्गमित केले आहेत.