ठाणे- कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या टाटा आमंत्रा या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना देण्यात आलेल्या जेवणात काल अळ्या सापडल्या. सोयाबीनच्या भाजीत या अळ्या सापडल्या असून या धक्कादायक प्रकराबाबत रुग्णांनी कोविड सेंटरमधील महापालिका अधिकाऱ्यांना माहिती दिली. मात्र, त्यावर अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप रुग्णांनी केला आहे. तर या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तत्काळ हे जेवण बदलण्यात आले असून याची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
कल्याण-डोंबिवलीत दररोज जवळपास ५०० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. असे असताना महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना देण्यात येणारे जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे, महापालिका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दरम्यान, जेवणामध्ये अळ्या सापडल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर तत्काळ हे सर्व जेवण बदलण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून संबंधित ठेकेदाराला सक्त ताकीद देण्यात आली आहे. ज्या दुकानातून सोयाबीन खरेदी केली, त्या दुकानाची चौकशी करत असून आवश्यकता वाटल्यास अन्न व औषध प्रशासनाला याबाबत कळवले जाईल, अशी प्रतिक्रिया महापालिका सचिव संजय जाधव यांनी दिली.