ठाणे - जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसाने आज उसंत घेतली आहे. त्यातच भिवंडीतील साठेनगर परिसरात असलेल्या डोंगरावर भूस्खलन होऊन पाच घरांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे या घरात राहणाऱ्या कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे. मात्र, दैव बलवत्तर म्हणून येथील कुटुंबीय वेळीच घराबाहेर पडल्याने जीवितहानी टळली आहे.
भिवंडी महापालिका क्षेत्रातील साठेनगर या डोंगरी परिसरातील रामनगर झोपडपट्टीत शेकडो घरे ही डोंगरावरील उतारावर उभारण्यात आली आहेत. याच परिसरात राहणारे पद्माकर पवार हे नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी सकाळी झोपेतून उठले असताना त्यांना त्यांच्या घराच्या भिंतींना मोठे तडे जात असल्याचा आवाज आला. त्यांनी तत्काळ या संकटाची चाहूल लागल्याने घरातील सर्वांना उठून बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी याची माहिती शेजाऱयांना दिली. त्यांनीही लगेच घराबाहेर पळ काढला. त्यानंतरच्या दहा मिनिटांनी भूस्खलन होऊन तिन्ही घरांच्या मागील बाजूकडील भिंती खचून खाली असलेल्या दोन्ही घरावर त्याचा ढिगारा पडला होता. यामध्ये एकूण पाच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या दुर्घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी नारपोली पोलिसांना कळवली. त्यानंतर महापालिकेचे आपत्कालीन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, डोंगरावर जाण्यासाठी अत्यंत चिंचोळा मार्ग असल्याने यंत्रसाम्रगी तेथे पोहचत नव्हती. अखेर बचाव पथकाने मनुष्यबळाचा वापर करून येथील ढिगारा उपसण्याचे काम सुरू केले.