ठाणे : कामगाराच्या हत्ये प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून फरार आरोपी कामगाराला काही तासातच पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद हनीफ इस्माईल (वय, २४) असे अटक केलेल्या आरोपी कामगारचे नाव आहे तर शफाउद्दीन राहत हुसेन (वय ३१) असे मृतक कामगाराचे नाव आहे.
दोघेही उत्तर प्रदेशचे : पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार मृतक शफाउद्दीन आणि आरोपी मोहम्मद हनीफ हे दोघेही मूळचे उत्तर प्रदेश मधील बाराबंकी जिल्हातील रहिवाशी असून ते सोनाळे गावातील वेगवेगळ्या चाळीच्या खोलीत राहत होते. हे दोघेही उदरर्निवाहसाठी भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावाच्या हद्दीत असलेल्या माल्टा कंपनीत काम करीत होते. २६ मार्च (रविवारी ) नेहमी प्रमाणे कंपनीत काम करत असताना दुपारी ११ च्या सुमारास मृतक शफाउद्दीन हा कंपनीतील एका ट्राॅलीमध्ये साहित्य टाकून नेत असताना अचानक आरोपी कामगार मोहम्मद हनीफ याला ट्राॅलीचा धक्का लागला. यावरून दोघात वाद झाला. यात आरोपी मोहम्मद हनीफ याने कंपनीतील शफाउद्दीनला जोरात मारले. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन शफाउद्दीन ठार झाला. नंतर आरोपी मोहम्मद हनीफ हा घटनास्थळावरुन फरार झाला होता.
रेल्वे स्थानकातून अटक : दरम्यान, भिवंडी तालुका पोलिसांचे पथक कंपनीत दाखल झाले. त्यांनी पंचनामा करत मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयात रवाना केला. नंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे , सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मतकर , पोलीस नाईक जयवंत मोरे, बाळा जाधव, केदार, मुकादम , वाळींबे या पोलीस पथकाला खबर लागली कि, आरोपी हा उत्तरप्रदेश मध्ये पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच, पोलीस पथकाने कल्याण रेल्वे स्थानकात सापळा रचून आरोपीला अटक केली. सोमवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मतकर करत आहेत.
हेही वाचा : Beed Crime : चारित्र्याचा संशय घेत विवाहितेची हत्या; पती, सासू, दीरासह नणंदवर गुन्हा दाखल