ठाणे - कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा सन 2020 ते 2021 चा अर्थसंकल्प ऑनलाइन मंजूर करण्यात आला आहे. 2 हजार 139 कोटींची तरतूद या आर्थिक वर्षासाठी करण्यात आली. महापालिकेच्या उत्पन्नात 142 कोटींची अतिरिक्त वाढ अपेक्षित असणारा हा अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी गुरुवारी महासभेत सादर केला.
जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव पाहता योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी 214 कोटी रुपयांचा निधीची आवश्यकता आहे. मात्र, राज्य सरकारकडून अजूनही फारशी मदत प्राप्त झाली नसल्याने महापालिकेच्या अर्थसंकल्पातून या रकमेची तरतूद केली जाणार आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती पाहून कोणतेही नवीन विकासकामे हाती न घेता सुरू असलेली कामे पुर्ण करण्याचे महापालिकेने ठरवले आहे. तसेच, कोरोनामुळे जी कामे पूर्ण करता आली नव्हती, त्यांचा आढावा घेऊन त्यासंदर्भात आर्थिक परिस्थितीचा आठवड्याभरात आढावा घेऊन कुठली कामे करायची याचा निर्णय घेऊ असे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी माहिती दिली. मात्र नवीन कामे नसल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या सदस्यांनी अर्थसंकल्पाविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - महाराष्ट्र सरकारला वाटतेय कंगनाची भीती -राम कदम
स्थायी समिती सभागृहाच्या दालनात स्थायी समितीचे सभापती विकास म्हात्रे यांनी महापौर विनिता राणे यांना हा अर्थसंकल्प सादर केला आहे . यावेळी महानगरपालिका आयुक्तही उपस्थित होते. तर, अन्य सदस्यांनी ऑनलाइनद्वारे सभेत सहभाग घेतला. आयुक्तांनी प्रशासनातर्फे हा अर्थसंकल्प या आधीच सादर केला होता, हा अर्थसंकल्प 1 हजार 917 कोटीचा होता तर स्थायी समितीने त्यात 142 कोटीची वाढ करण्याचे सुचविल्यामुळे हा अर्थसंकल्प 2 हजार 139 कोटीवर गेला आहे. दरम्यान, महापालिकेच्या सुधारित अर्थसंकल्पात 1 हजार 434 कोटी रुपये उत्पन्न तर 1 हजार 213 कोटींचा खर्च दाखविण्यात आला आहे. त्यामुळे महापालिका तिजोरीत 211 कोटी रुपये शिल्लक अपेक्षित आहेत. तर, स्मार्टसिटी प्रकल्पाअंतर्गत 24 प्रकल्पाच्या काम करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान आवास योजनेत रूपांतरित केलेल्या 3 हजार घरांच्या विक्रीतूनही उत्पन्न अपेक्षित धरले आहे.