ठाणे - ‘पत्रकार समुदाय झिंदाबाद’ या व्हॉट्सअॅप ग्रुपवर एका धर्माविषयी तेढ निर्माण होईल, असा मजकूर प्रसारीत करण्यात आला होता. त्याप्रकरणी पत्रकारांच्या गटसमुहाविरोधात कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावरून देशात काही धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यातच आता पुन्हा नवीन वादाची ठिणगी नको म्हणून कल्याण पोलीस सतर्क झाले ( kalyan police case register against viral hateful text whats app ) आहेत.
पोलिसांनी घेतली व्हायरल पोस्टची दखल - ‘पत्रकार समुदाय झिंदाबाद’ या व्हॉट्सअॅप ग्रुपवर एका धर्माविषयी, त्या धर्मातील रुढीपरंपरा विषयी समाजात तेढ निर्माण होईल, अशा पध्दतीने लिखाण करण्यात आले. हा मजकूर व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल करण्यात आला होता. या घटनेची गंभीर दखल घेत, कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशिर शेख यांच्या हा प्रकार निदर्शनास येताच, त्यांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून हा मजकूर लिहिणाऱ्या व व्हायरल करणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे.
सोशल मीडिया वापरकर्त्यांना आवाहन - नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावरून देशात अशांततेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पोलिसांनी सामाजिक सलोखा राहावा यासाठी कोणाची निंदा होईल, अशा प्रकारचा मजकूर व्हॉट्सअॅपवरती येणार नाही याची काळजी घेण्यास सुरूवात केली आहे. सामाजिक भान राखून प्रत्येक नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करावा. धार्मिक तेढ निर्माण होईल, आपल्यामुळे कोणी दुखावले जाईल, असा मजकूर सोशल मीडियात प्रसारित करू नये, असे आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे.
हेही वाचा - Pune ATS : लष्कर ए तोयबाच्या संपर्कातील आणखी एका तरुणाला पुणे एटीएसकडून अटक