ठाणे - दुचाकीत पेट्रोल टाकले तर पाणी कसे निघते, असा जाब विचारला म्हणून दोन तरुणांना पेट्रोल पंपावरील सर्व कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना डोंबिवलीतील उस्मा पेट्रोल पंपावर घडली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी पंपावरील चार कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. वीरेंद्र सिंग, विक्रम सिंग, गोविंद शहा आणि अभय काटवटे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
कल्याण पूर्वेत राहणारा मोहम्मद सहीम आणि त्याचा मित्र शुभम सिंग काही कामानिमित्त मुंबईला गेले होते. येताना त्यांच्या दुचाकीमध्ये पेट्रोल कमी असल्याने त्यांनी त्यांची दुचाकी डोंबिवलीतील उस्मा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी नेली. दुचाकीत पेट्रोल टाकले, पण काही अंतरावर गेल्यानंतर दुचाकीत बिघाड झाला. मोहम्मद सहीम हा गॅरेजमध्ये काम करतो, त्यामुळे त्याने दुचाकीतील पेट्रोल चेक केले असता त्या दुचाकीतून पेट्रोलऐवजी पाणी बाहेर आले.
त्वरित त्यांनी पुन्हा पेट्रोल पंपावर जाऊन याविषयी विचारणा केली की, दुचाकीत पेट्रोल भरले होते तर, त्यातून पाणी कसे बाहेर आले. पेट्रोल कुठे गेले? या गोष्टीचा राग येऊन कर्मचाऱ्यांनी दोन्ही तरुणांना मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत शुभमचे हात आणि पाय फ्रॅक्चर झाले आहेत. तर मोहम्मदला ही गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.