ठाणे - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला असून गुरुवारी एकाच दिवशी तब्बल 323 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाल्याने पालिका आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आल्याची ही आतापर्यंतची पहिलीच वेळ आहे.
उच्चभ्रू सोसायटींमध्ये गेल्या 10 ते 12 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव झाला आहे. गुरुवारी आढळून आलेल्या या 323 रुग्णांमुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4 हजार 515 वर जाऊन पोहोचली आहे. यापैकी 2 हजार 365 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून आतापर्यंत एकूण 2 हजार 59 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 91 जणांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे.
गेल्या 14 ते 15 दिवसांपासून कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या दररोज दोनशेपेक्षा अधिक आकडा गाठत होती. गुरुवारी मात्र या रुग्ण संख्येने तीनशेचा टप्पा ओलांडला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून महापालिकेची आरोग्य व्यवस्था रुग्णांना उपचार देण्यात कमी पडताना दिसत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांचा वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे मृत्यू झाला आहे. शासकीय उपचार मोफत मिळणाऱ्या ठिकाणी सोयी सुविधांची उपलब्धता कमी असल्याने खासगी दवाखाने कोरोना रुग्णांना आपल्या उत्पन्नाचे साधन समजून लाखोंची लुटमार करत आहेत. त्यामुळे जगावे की मरावे? हा प्रश्न सामान्य नागरिकांपुढे उभा राहिला आहे.
दरम्यान, गेल्या 15 दिवसांपासून सर्वाधिक रुग्ण कल्याण पश्चिम परिसरात आढळून आले आहे. गुरुवारीही आढळून आलेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक संख्या कल्याण पश्चिम परिसरातच 110 रुग्ण, कल्याण पूर्वेत 57, डोंबिवली पश्चिम मध्ये 87, तर डोंबिवली पूर्वेत 48 आणि मांडा, टिटवाळा, मोहने भागात 21 रुग्ण असे एकाच दिवशी 323 रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाल्याने पालिका आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.