ठाणे - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या इ प्रभाग हद्दीतील नांत स्वामी समर्थ मठासमोर असलेल्या 7 मजल्यांच्या अनधिकृत बालाजी संकुलाच्या दोन इमारतीवर पालिकेने हातोडा मारला. मात्र, तळ मजला अधिक दोन मजले रिकामे असल्याने त्यावर कारवाई करण्यात आली. यामुळे वरच्या मजल्यावर रहाणारे रहिवासी घाबरून खाली आले आणि संतप्त झालेल्या रहिवाशांनी केडीएमसीच्या कारवाई विरोधात आक्रोश केला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे राजरोस सुरु आहेत. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे 7-8 मजली इमारती उभ्या राहत आहेत. बेकायदा इमारतींची बांधकामे सुरु असताना पालिका प्रशासन कारवाई करत नाही. मात्र, इमारतींमधील रूम विकल्या गेल्या आणि लोक राहायला आल्यानंतर पहिल्यांदाच महापालिकेने बेकायदा इमारतीवर कारवाई केल्याची घटना नांदिवली परिसरात घडली आहे.
महापालिकेच्या २७ गावांपैकी ग्रोथ सेंटर असलेल्या १० गावांमध्ये एमएमआरडीए नियोजन प्राधिकरण आहे. या गावांमध्ये नवीन बांधकामे करण्यास एमएमआरडीए परवानगी देत नसल्याचा आरोप यापूर्वी स्थानिकांनी केला आहे. बांधकाम परवानगी मिळत नसल्याने या भागात बेकायदा बांधकामे करण्यात येत आहेत. २७ गावांपैकी एक असणाऱ्या नांदिवली येथील स्वामी समर्थ मठाजवळ बालाजी कॉम्प्लेक्स नावाच्या दोन 7 मजली इमारती वर्षभरापूर्वी बेकायदा बांधण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सुमारे १०० कुटुंब वर्षभर राहत आहेत.
बुधवारी सकाळी या इमारती तोडण्यासाठी महापालिका अतिक्रमण विभागाचे पथक पूर्वसूचना न देता २ पोकलँड मशीन, जेसीबी, अधिकारी-कर्मचारी व पोलिस असा प्रचंड फौजफाटा घेऊन प्रभाग अधिकारी रवींद्र गायकवाड बालाजी इमारतीजवळ आले. तोपर्यंत इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांपैकी कोणालाही काहीच कल्पना नव्हती. आधी जेसीबीच्या सहाय्याने इमारतीची कम्पाऊंड वॉल पाडण्यात आली. दुपारनंतर तळ मजल्यावरील गाळे तोडण्यात आले. जेसीबी व पोकलँडच्या दणक्याने इमारतीचा परिसर हादरून गेला आणि रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. पहिल्या दुसऱ्या मजल्यावरील रुमच्या भिंती तोडण्यास सुरुवात केल्याने इमारतीत राहणारे नागरिक संतापले व त्यांनी या कारवाईला विरोध केला. कोणतीही नोटीस न देता अचानक कारवाई केल्याने नागरिकांमध्ये रोष वाढला होता. त्यावेळी तेथे असलेल्या महापालिका अधिकाऱ्यांनी महापालिकेने तीन नोटीसा बजावल्या असल्याचे सांगितले. मात्र, रहिवाशांनी आपल्याला एकही नोटीस मिळाली नसल्याचे सांगितले. आयत्या वेळेस तिसरी नोटीस देऊन ती दारावर लावण्यात आल्याची तक्रार महिला करत होत्या. घर घेताना सर्व कागदपत्रे दाखवली, म्हणून तर आम्ही घर घेतले. आता मात्र बिल्डर लपून बसल्याची तक्रार महिला करत होत्या. पालिकेची कारवाई अन्याय कारक असून बिल्डरने आमची फसवणूक केली. आता आम्ही जायचे कुठे ? असा आक्रोश रहिवासी करत होते. या वादामुळे या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर सायंकाळी राहती घरे वगळता कारवाई पूर्ण झाल्याने बांधकाम पाडणे थांबवण्यात आले.
या संदर्भात प्रभाग अधिकारी रवींद्र गायकवाड यांना विचारले असता सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कारवाई करत असल्याचे त्यांनी सांगितले. ४ प्रभाग अधिकारी, २ पोकलँड, ३ जेसीबी मशीन, पोलिस व इतर कर्मचारी असा मोठा फौजफाटा या कारवाईत सहभागी झाला होता. डीपी रस्त्याच्या मध्ये या इमारती वर्गीस म्हात्रे या बांधकाम व्यावसायिकाने बांधल्याचे त्यांनी सांगितले. खास सूत्रांच्या माहितीनुसार केडीएमसीचा एक निलंबित अधिकारी व एक वरिष्ठ अधिकारी यांच्या संघर्षात नागरिकांचा बळी घेण्यात आल्याची कुजबुज उपस्थित नागरिकांमध्ये सुरू होती.