ठाणे - मनुस्मृतीमधील जातीव्यवस्थेने 95 टक्के लोकांना देवळापासून स्मशानापर्यंत जाण्याचा अधिकारच नाकारला. त्यांनी नागरिकत्वाचे पुरावे द्यायचे कोठून? असा थेट प्रश्न करत सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणीच्या (एनआरसी) नावाखाली देश तोडण्याचे षड्यंत्र मोदी-शहा आणि भागवत यांनी रचले असल्याची टीका गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे येथे केले. ते तिरंगा मोर्चा या आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
हेही वाचा - ठाण्यात युवक काँग्रेसची 'एनआरयू' मोहीम, भाजपला घेरण्यासाठी देशभर होणार आंदोलन
आव्हाड म्हणाले, की हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात नाही तर हा कायदा संविधानाच्या विरोधात आहे. म्हणूनच संविधानिक मार्गाने आंदोलन करणार्यांवर हल्ले केले जात आहेत. मात्र, कोणीही हिंसेला उत्तर हिंसेने देऊ नका, हा देश बुद्ध आणि गांधीजींचा आहे. त्यांनी फेकलेला दगड आपण झेलूया अन् त्या दगडानेच त्यांच्या विचारधारेची कबर बांधूया, असे आवाहन आव्हाड यांनी केले.
ठाणे शहरात कुल जमात तंजीम या संघटनेच्या पुढाकाराने एनआरसी आणि सीएएच्या विरोधात मूक मोर्चा काढण्यात आला होता. राबोडी येथून सुरू झालेला मोर्चा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विसर्जित करण्यात आला. याप्रसंगी निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील, राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस सुहास देसाई, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण, रिपाइंचे सुनील खांबे, वंचित बहुजन आघाडीचे संजय मिरगुडे आदी उपस्थित होते. या मोर्चामध्ये हजारो लोकांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.
आव्हाड पुढे म्हणाले, की गोवंश हत्याबंदी करुन सर्वात आधी या सरकारने आमच्या खाण्याच्या अधिकारावर गदा आणली होती. मी ठामपणे सांगू शकतो की एकही मुस्लीम बांधव गायीचे मांस खात नाही. तरीही, ही बंदी आणण्यात आलीच. उद्या हे मोदी-शहा फापडा, जिलेबी देशाचे राष्ट्रीय अन्न म्हणून जाहीर करायला मागे पुढे पाहणार नाहीत. सुधारित नागरिकत्व, राष्ट्रीय नोंदणी कायद्यातून केंद्र सरकारकडून हिंदू-मुस्लिम वाद पेटवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी यातून दोन्ही समाज एकत्र झाल्याचे चित्र सर्वत्र उभे राहिले आहे. या ठिकाणी मोदी-शहांचे आभारच मानले पाहिजेत. त्यांच्यामुळेच इथला मुस्लीम, हिंदू, शिख, इसाई, बौद्ध एकवटला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा - कुणाल कामराची 'इंडिगो'ला नोटीस, मागितली 25 लाखांची नुकसानभरपाई