ठाणे: जखमी सत्यप्रकाश तिवारी हा बदलापूरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंगचे काम करतो. त्यातच सत्यप्रकाश हा १ एप्रिल रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास बदलापूर पूर्वे भागातील रिलायन्स मार्ट दुकानाच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे फिटिंग करण्यासाठी गेला होता. यालगतच पनवेलकर मार्गावर गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. सत्यप्रकाश सीसीटीव्ही कॅमेरे फिटिंगचे काम करत होता. त्यावेळी अचानक इमारतीच्या आठव्या मजल्यावरून एक ५ ते ६ फुटाची लोखंडी सळई खाली कोसळली. ही सळई सत्यप्रकाश याच्या खांद्यात घुसून पाठीतून आरपार बाहेर पडली होती. अश्याच स्थितीत घटनास्थळी सत्यप्रकाश हा बसून होता.
डॉक्टरांच्या प्रयत्नांनी वाचले प्राण: दुसरीकडे इमारतींमध्ये काम करणाऱ्या कामगारांमध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर काही नागरिक आणि कामगारांनी सळई शरीरात असलेल्या परिस्थितीत सत्यप्रकाश याला तातडीने बदलापूर शहरातील गांधी चौकात असलेल्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी सत्यप्रकाशवर तातडीने शस्त्रक्रिया करत त्याच्या खांद्यात घुसलेली लोखंडी सळई काढली आहे. विशेष म्हणजे, त्याचे नशीब बलवत्तर होते म्हणून त्याच्या डोक्यात ही सळई घुसली नाही अथवा त्याला प्राण गमवावे लागले असते.
जखमीची प्रकृती स्थिर; पण...: कामगार तिवारीवर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे. मात्र याप्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आला नसून तपासाअंतीच गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी ठाणेकर पॅलेसियो गृह प्रकल्पाचे विकासक अजय ठाणेकर यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सत्यप्रकाशवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बांधकाम परिसरात अनेकदा बिल्डरकडून सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात नाहीत. त्याचे दुष्परिणाम नागरिकांना अथवा कार्यरत कामगारांना भोगावे लागत असून प्रसंगी प्राण गमवावे लागतात. अनेकदा कामगारांवर कायमचे अपंगत्व ओढावते.
हेही वाचा: Savarkar Gaurav Yatra: सावरकरांचा अपमान सहन केला जाणार नाही हे यात्रेतून दाखवून देऊ -मुख्यमंत्री