ठाणे Thane Water Story : ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने उत्पन्न वाढीसाठी नळ संयोजनांवर मीटर बसवलं खरं, परंतु त्यांचा हा प्लॅन स्पशेल फसल्याचा प्रत्यय सध्या येत आहे. उत्पन्न वाढीसाठी नळ संयोजनांवर मीटर बसवून, पूर्वीच्याच जुन्या दरानुसार पाणी बिलाची वसुली केल्याने, ठाणे महानगरपालिकेला कोट्यावधींचा तोटा सहन करावा लागत आहे. पाणी खरेदी, कर्मचारी आणि निगा देखभाल याच्यावर पाणीपुरवठा विभागाकडून वार्षिक २५० कोटी रुपये खर्च केला जात आहे. परंतु पाणी विभागाचं वार्षिक उत्पन्न शंभर कोटीच्या आसपास असल्याचं आकडेवारीनुसार समजतंय. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्याने, पाणीपुरवठा विभागाला आता पाणीपुरवठा करणं कठीण जात असल्याचं चित्र आहे.
नेत्यांनी केला दरवाढीला विरोध : ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत सर्वाना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी पाणीपुरवठा विभागाची असून आज ५८५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष, स्टेमकडून ११५ दशलक्ष, एमआयडीसीकडून १३५ दशलक्ष आणि स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लिटर एवढे पाणी दररोज उचलले जाते. परंतु पाणी गळती आणि इतर उत्पन्न खर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने विविध भागात एक लाखाहून अधिक स्मार्ट मीटर बसवले. या मीटरद्वारे वापरत असलेल्या पाण्याचे बिल आकारले जात असल्याने, पाण्याची नासाडी देखील टाळली जात होती. पाण्याचे मीटर बसवताना महापालिकेने नवीन दरही निश्चित केले. परंतु निवडणुका जवळ असल्याने काही राजकीय नेत्यांनी या दरवाढीला विरोध केला. तसे पाहायला गेले तर मागील दहा वर्षात दर वाढ झाल्याने पाणीपुरवठा विभागाच्या उत्पन्नावर आधीच परिणाम होत होता. त्यातच काही महिन्यांपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी पूर्वीच्याच दराने कराची वसुली करण्याचं राजकीय मंडळींनी निश्चित केल्यामुळं त्याचा परिणाम उत्पन्नावर झाला. त्यामुळं डिसेंबर अखेरपर्यंत पाणीपुरवठा विभागाकडून २२५ कोटींचं लक्ष असताना केवळ ७१ कोटींचीच वसुली झाल्याचं स्पष्ट झालंय.
११० कोटींचा वार्षिक खर्च : ठाणे महानगरपालिका इतर प्राधिकरणाकडून ज्यादा दराने पाणी खरेदी करते, त्यात मुंबई महानगरपालिकेकडून प्रति हजार लिटर मागे १३.५० रुपये, स्टेम ११.५० रुपये, एमआयडीसी ०९, स्वतःचे पाणीपुरवठा योजनेतून ६.५० रुपये यांचा समावेश आहे. परंतु पुरवठा करताना मात्र केवळ ७.५० रुपये प्रति हजार लिटर एवढाच दर आकारला जातो. याचा अर्थ पाणी विकत घेण्यासाठीच ठाणे महानगरपालिकेकडून तब्बल १४० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. त्यातच वीज बिल, कामगारांचे पगार, यंत्रसामग्री देखभाल आणि दुरुस्ती यासाठी ११० कोटींचा वार्षिक खर्च केला जातो. त्यामुळं वार्षिक खर्च हा २५० कोटींवर जात असून एकूण उत्पन्न मात्र १०० कोटीच्या आसपास असल्याने, पाणीपुरवठा विभागाला दरवर्षी मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
उत्पन्नापेक्षा खर्च दीडपट : महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या उत्पन्नामध्ये शंभर कोटी रुपये पालिकेला मिळतात. मात्र खर्च अडीचशे कोटी रुपयांचा आहे. ही तूट भरून काढण्यासाठी सर्वात आधी पाण्याचा ऑडिट करून नियोजनाची आवश्यकता आहे. पाण्याची चोरी आणि गळती या बाबी थांबवल्या असल्या तरी, ही तूट मोठ्या प्रमाणात भरून येऊ शकते, असं सामाजिक कार्यकर्ते सांगतात.
हेही वाचा -
- Water Issue: धरणांच्या तालुक्यात भीषण पाणी टंचाई; दोनशेहून अधिक योजना केवळ कागदावरच पुर्ण
- Water Crisis in Nashik : नाशिक जिल्ह्यातील धरणात २२ टक्के पाणीसाठा, वाड्या-वस्त्यांवर 63 टँकरद्वारे पाणी पुरवठा
- Mumbai Water Supply: मुंबईकरांना मिळणार मोठा दिलासा; पाणी कपात रद्द, 'या' तारखेपासून मुंबईचा पाणी पुरवठा सुरळीत होणार