ठाणे- भिवंडीतील अनधिकृत केमिकल साठा असणाऱ्या गोदामांवर नारपोली पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर वळगाव येथील प्रेरणा कॉम्प्लेक्स येथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर केमिकल साठा असल्याची माहिती नारपोली पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारावर पोलिसांनी या गोदामांवर छापा टाकून सुमारे २० लाख ९० हजार रुपये किंमतीचा अवैध केमिकल साठा जप्त केला आहे. व गोदाम मालकावर गुन्हा दाखल केला आहे.
महेश वेलजी मारू (वय.४० रा. अंजूरफाटा) असे अवैध केमिकल साठा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या गोदाम मालकाचे नाव आहे. भिवंडीत गोदाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला असून या गोदामांमध्ये बेकायदेशीर केमिकलचा साठा मोठ्या प्रमाणात साठवला जात आहे. या बेकायदेशीर केमिकल साठ्यांना आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांकडून या अवैध केमिकल साठ्यांविरोधात पोलीस यंत्रणेकडे वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन भिवंडीतील अनधिकृत केमिकल साठा असणाऱ्या गोदामांवर नारपोली पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
पोलिसांना वळगाव येथील प्रेरणा कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या मुमाई वेअर हाऊस बिल्डिंग नं.ए- ७ गाळा नं.४ येथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर केमिकल साठा असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणावरील गोदामांवर छापा टाकून केमिकलचे ९०० कार्बो व ५० लोखंडी ड्रम, असा सुमारे २० लाख ९० हजार रुपयांचा अवैध केमिकल साठा जप्त केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उप निरीक्षक पराग भाट करीत आहे.