ठाणे - राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा विक्रीसाठी दोन गोडाऊनमध्ये लपवून ठेवणाऱ्या एका किराणा दुकानदाराला मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत त्याच्याकडून जवळपास ८० हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. जग्गू खिलानी (वय ३३), असे अटक करण्यात आलेल्या दुकानदाराचे नाव आहे.
उल्हासनगर शहरातील कॅम्प नं. ३ येथील अशोक अनिल सिनेमाच्या मागे असलेल्या जग्गू किराणा स्टोअर्स या दुकानात प्रतिबंधित असलेला गुटख्याचा साठा विक्रीसाठी ठेवण्यात येत असल्याची माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळाली होती. त्यांनी अन्नसुरक्षा अधिकारी यांच्या मदतीने त्या किराणा दुकानावर छापा टाकला. त्यावेळी त्या किराणा दुकानात तसेच जवळच असलेल्या दोन गोडऊनमध्ये लपवून ठेवलेला वेगवेगळया प्रकाराचा गुटखा पोलिसांना मिळून आला. त्या ठिकाणाहून जवळपास ८० हजार रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी किरण जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात किराणा दुकानदार जग्गू खिलानी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.एन. वारे करीत आहेत.