ठाणे - पत्नीने दुचाकीची चावी देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने तिच्या अनामिकेला चावा घेतल्याची घटना घडली. बोटाला कडाडून चावा घेतल्याने पत्नीच्या बोटाचा काही भाग तुटून वेगळा झाला आहे. ही घटना कल्याणजवळच्या मोहने परिसरात घडली. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात पती विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. कबीर साबळे (वय, ५०) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे.
बोटाचा पाडला तुकडा -
मोहने परिसरातील एका चाळीत आरोपी कबीर साबळे हा पत्नी आणि दोन मुलांसह राहतो. त्याला दारूचे व्यसन जडले आहे. नेहमीप्रमाणे काल (रविवार) सकाळच्या सुमारास कबीर दारू पिऊन घरी आला होता. त्यावेळी त्याने पत्नीला यांच्याकडे दुचाकीची चावी मागितली. मात्र, पत्नीने चावी देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या कबीरने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान त्यांच्या मुलांनी आईला सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, राग अनावर झालेल्या कबीरने पत्नीच्या अनामिकेला (करंगळी शेजारचे बोट) कडाडून चावा घेऊन ते वेगळे केले. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात पत्नीने पती विरोधात गुन्हा दाखल करताच पोलिसांनी हल्लेखोर पतीला अटक केली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये घडले होते यापेक्षा भयानक -
काही महिन्यापूर्वी उत्तर प्रदेशच्या बांदामध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली होती. या घटनेत पत्नीची हत्या करून तिचे शिर हातात घेऊन पती पोलीस ठाण्यात पोहचला होता. चिन्नर यादव असे आरोपीचे नाव होते. पत्नीचे शीर हातात घेऊन निघालेल्या चिन्नारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.