ठाणे - बंद घरांची रेकी करून घरफोडी करणारे सराईत चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. या चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. शेखर नटराज नायर (34) रा. कैलास कॉलनी, अंबरनाथ पुर्व, देवेंद्र गणेश शेट्टी (23) रा. मद्रासीपाडा चाळ, उल्हासनगर आणि सुनिता शेखर नायर, (28) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
आरोपींना उल्हासनगरातून अटक -
कल्याण पश्चिम परिसरातील रामबागमध्ये सोमनाथ बाळासाहेब सिनारे हे कुटूंबासह रामबागमधील मुकुंद सोसायटी राहतात. १४ जानेवारी रोजी दिवसभर सिनारे कुटूंब घराला कुलूप लावून कामानिमीत्त बाहेर गेले होते. त्यावेळी या आरोपी तीघांनी त्यांच्या घराची रेकी करून दरवाज्याचा कुलूप व कडी तोडले. तसेच 1 लाख 27 हजार 500 रुपयांचे दागिने लंपास केले. याप्रकरणी सिनारे कुटुंबियांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली असता, दोन संशियत व्यक्ती त्यांना जाताना दिसले. याच आधारावर पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला. त्यानंतर पोलिसांनी अंबरनाथमधून शेखर व सुनिता या पती पत्नीला व साथीदाराला उल्हासनगरातून अटक केली.
बंद घरांची करायचे रेकी -
चोरटे त्यांच्याकडील कोरी नंबरप्लेट लावलेली मोटारसायकल घेऊन येत. तर यातील एक आरोपी शोल्डर बॅग खांद्याला लटकावून प्रथमत: बंद फ्लॅट अगर घराची रेकी करत असे, त्यानंतर दुसरा आरोपी येऊन एकत्रितपणे बंद फ्लॅट किंवा घराचा कोयंडा तोडून घरफोडी करून पायी किंवा रिक्षाने मोटारसायकल उभी केलेल्या ठिकाणाचे जवळ येऊन मोटारसायकलवरून गल्ली बोळातून निघून जात होते. तर शेखरची पत्नी सुनिता ही त्या दागिन्यांची विक्री करून त्याची विल्हेवाट लावत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
घरफोडीच्या तीन गुन्ह्याची उकल -
महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन, तर अंबरनाथमध्ये एक घरफोडी केल्याची कबुली चोरट्यांनी दिली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, 4 मोबाईल हॅण्डसेट, 1 टॅब असा एकूण 80 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल आणि घरफोडीत लंपास केलेले 1 लाखांच्यावर दागिने जप्त केले. तर दुसऱ्या घरफोडीतील 2 लाख 30 हजार 600 रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा- प्रभू श्रीराम म्हणजे राष्ट्रदेव; राज्यपाल कोश्यारींनी मंदिरासाठी दिला लाखाचा निधी