ठाणे - भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात स्टेम प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा केला जातो. मात्र ज्या मोठ्या जलवाहिनीतून गावकऱ्यांना पाणी पुरवठा करण्यात येतो, त्या जलवाहिनीला शेकडो अनधिकृत नळ जोडणी झाल्याचे समोर आले होते. या गंभीर प्रकाराविषयी गावकऱ्यांनी स्टेम प्राधिकरणाकडे कारवाईची मागणी केली होती. मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्याने गावकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने स्टेम प्राधिकरणाला कारवाईचे आदेश दिल्याने मोठ्या पोलीस बंदोबस्तात आज शेकडो अनधिकृत नळ जोडण्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
भिवंडी, ठाणे व मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रासह भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रास पाणी पुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणाकडून भिवंडी पालिकासह ग्रामपंचायत क्षेत्रात पाणी पुरवठा केला जातो. मात्र मोठ्या जलवहिनीतून अनधिकृत नळ जोडणी करणारी पाणी माफियाची टोळी आर्थिक हित साध्य करीत बिनधास्तपणे नळ जोडणी करत आहे. त्यातच भिवंडी तालुक्यातील कांबे ग्रामपंचायत क्षेत्रासाठी स्टेम प्राधिकरणाकडून दररोज एक एमएलटी पाणीपुरवठा केला जातो. परंतु ही पाईपलाईन भिवंडी शहरातील ज्या भागातून जात आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत नळ जोडणी झाल्याने या ग्रामस्थांना कमी दाबाने अत्यल्प असा पाणी पुरवठा होत असल्याने कित्येक वर्षे याबाबत संघर्ष करूनही या परिस्थितीत बदल न झाल्याने ग्रामस्थांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करत दाद मागितली होती.
हे ही वाचा -दौंड शुगरमध्ये कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही- संचालक वीरधवल जगदाळे
आतापर्यत ३१० नळ जोडण्यांवर कारवाई -
उच्च न्यायालयात पाणी चोरी प्रश्नावर सुनावणी होऊन पाणी ही प्रत्येकाची गरज असून ते त्यांच्यापर्यंत पोहचविण्याची व त्या ठिकाणी होत असलेली पाणी चोरी रोखण्याची जबाबदारी स्टेम प्रशासनाची असल्याचे स्पष्ट केल्यानंतर स्टेम प्रशासनाला खडबडून जाग आली असून मागील आठ दिवसांपासून खोणी, काटई, कांबे या ग्रामपंचायत क्षेत्रासह भिवंडी पालिका हद्दीतील मिल्लत नगर, नवीबस्ती, फेणापाडा, कामतघर, नारपोली या भागात मोठा पोलीस फौजफाटा घेऊन कारवाईस सुरुवात केली आहे. आतापर्यंत झालेल्या कारवाईत तब्बल 310 नळ जोडणी तोडण्यात आल्या असून या कारवाईत स्टेम प्राधिकरणाचे अधिकारी कर्मचारी ,पालिका कर्मचारी यांसह शेकडो पोलीस सहभागी होत आहेत.