ठाणे - राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयातील सोयी सुविधा देखील अपुऱ्या पडत असून नागरिकांना ऑक्सिजनसह रेमडेसिवीर इंजेक्शनचा देखील मोठा तुटवडा भासत आहे. त्यातच भिवंडीतील काही रुग्णालयांमध्ये रुग्णाची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासगी रुग्णालयांना शासकीय नियमाप्रमाणे बिल आकारण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र भिवंडीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशांकडे खासगी रुग्णालयाचे डॉक्टर व रुग्णालय प्रशासन दुर्लक्ष करतांना दिसत आहेत.
खासगी रुग्णालयांच्या आर्थिक पिळवणुकीकडे लक्ष देण्याची मागणी-
शासकीय नियमांना बगल देत भिवंडीतील काही खासगी रुग्णालये मानमर्जीने मोठ्या प्रमाणात बिल आकारत असल्याच्या घटना वेळोवेळी समोर येत आहेत. खासगी रुग्णालयांकडून होत असलेल्या आर्थिक पिळवणुकीमुळे ऐन कोरोना संकटात रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच जर भरले नाही तर रुग्णालयांकडून दमदाटी अथवा पोलीस कम्प्लेंट करण्याचा दम देखील रुग्णानासह रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना उपचारानंतर बरे झाल्या नंतर खासगी रुग्णालयांची बिले भरण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागत आहे. खासगी रुग्णालयांच्या या आर्थिक पिळवणुकीकडे महसूल , पोलीस , व मनपा प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी रुग्णानाचे नातेवाईक करीत आहेत .
खासगी रुग्णालयाची थेट पोलीस ठाण्यात तक्रार -
मागील आठवड्यात शहरातील खासगी कोविड रुग्णालय अल मोईन या रुग्णालयात रुग्ण बरा झाल्यानंतर रुग्णाला भरमसाठ बिल दिले होते. यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरत बिल कमी करण्याची विनंती केली. मात्र रुग्णालय प्रशासनाने थेट रुग्णालयाचे दरवाजे आतून बंद करत रुग्णांसह रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णालयात कोंडून ठेवले होते. रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यावेळी काढलेली व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. मात्र रुग्णालयाने रुग्णाच्या नातेवाईकांकडून संपूर्ण बिल भरून घेतल्या नंतरच नातेवाईकांची सुटका केली होती.
ही घटना ताजी असतानाच बुधवारी राहनाळ येथे आलेल्या मढवी कोविड रुग्णालयात रुग्णाकडून रुग्णांची लूट होत असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. वडूनवघर गावातील बाळू पाटील यांच्यावर या रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयाने तीन दिवस आयसीयू व सात दिवस जनरल वॉर्डात असे नऊ दिवस रुग्णालयात उपचार केले. मात्र या नऊ दिवसांसाठी रुग्णाच्या नातेवाईकाने तब्बल १ लाख ६७ हजार रुपयांचा बिल भरला आहे. विशेष म्हणजे रुग्णालयाने त्यांना आकारलेल्या बिलामध्ये आयसीयू चार्जेस एका दिवसाला नऊ हजार रुपये आकारण्यात आला आहे, तर आयसीयू मध्ये ओटू सुविधा पुरविली त्याचे पाच हजार एका दिवसाचे आकारले असून आयसीयूमध्ये असलेल्या मॉनिटरचे पंचारशे रुपये प्रतिदिन आकारले आहेत. अशा प्रमाणे आयसीयू व जनरल वरचे १ लाख ६७ हजार रुपये बिल रुग्णांच्या नातेवाईकांनी भरले असल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली आहे.
एवढी मोठी रक्कम भरूनही मेडिकल बिल ३३ हजार या बिलाव्यतिरिक्त आकारले. मेडिकल बिल भरण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांकडे पैसे नसल्याने रुग्णाला डिस्चार्ज देण्यास रुग्णालयाने नकार दिला व नातेवाईकांची तक्रार थेट नारपोली पोलिसांना केली.
चौकशी करून न्याय देण्याचे पालिका आयुक्तांची प्रतिक्रिया-
एक लाख ६७ हजारांचे बिल भरूनही रुग्णालये आता दमदाटी व पोलिसांची भीती घालून रुग्णाकडून बिल वसूल करीत आहेत. मात्र शासन निर्देशाचे पालन न करता अव्वाच्या सव्वा बिल आकारणाऱ्या रुग्णालयावर पोलीस प्रशासनासह महापालिका प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याने रुग्णांसह नातेवाईक हैराण झाले आहेत.
यासंदर्भात भिवंडी मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया यांच्याकडे विचारणा केली असता, या संदर्भात आपण माहिती घेऊन चौकशी करू व रुग्णाला न्याय मिळवून देऊ, अशी प्रतिक्रिया मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी दिली आहे.