ठाणे - महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात विशेषतः कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ आज दुपारच्या सुमारास धडकले. यानंतर कल्याण-भिवंडीतील खाडी किनाऱ्यावर राहणाऱ्या रहिवाशांना बुधवारी आणि गुरुवारी अलर्ट राहाण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. हवामान खात्याने मुंबई व आसपासच्या जिल्ह्यांमध्ये ३ आणि ४ जून रोजी हायअलर्ट जारी केला आहे.
3 जून रोजी संध्याकाळपर्यंत चक्रीवादळ उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीवर बसू शकेल. त्यातच हे चक्रीवादळ जमिनीवर येताना त्याची गती 100 किमी / तासापर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे, पालघर, पुणे, ठाणे, मुंबई, रायगड, धुळे आणि नंदुरबार येथे जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला.
पूर्व मध्य अरबी समुद्रात खोल चक्रीवादळ सुरू असून ते तीव्र वादळामध्ये बदलेल आणि 3 जूनला दुपारी महाराष्ट्र ओलांडेल. यावेळी, प्रत्येकाने खाली दिलेली माहिती लक्षात घेऊन कृती करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
1 कच्च्या घरात राहाणाऱ्या नागरिकांनी त्याठिकाणाहून बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी जावे
2. या तीव्र वादळात वीज कोसळण्याची तसेच घरांची पडझड होण्याची शक्यता आहे
3. आतापासून आपल्या घरातील वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवा
4 खाडी जवळ राहाणाऱ्या लोकांनी स्थानिक शासकीय संस्था यांनी निवडलेल्या सुरक्षित ठिकाणी जावे
5. कोणत्याही मदतीशिवाय घराबाहेर पडू नका.
6. पोलीस आणि शासकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीचे पालन करावे.
7. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने सामाजिक नियमांचे पालन करा, असे आवाहन पोलिसांनी केले. दरम्यान, कल्याण, डोंबिवली , भिवंडी, शहापूर, परिसरात मंगळवारीे रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरु होती. अशात आज दुपारनंतर पावसाने जोर धरला आहे. तर काही भागात वादळी वाऱ्यामुळे झाडे पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.