ठाणे - जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर पावसाची तुफान बॅटिंग झाली. यामुळे उल्हासनगर शहरातील अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे वाहतुकीचा वेगही मंदावला होता. तर दुसरीकडे प्रसिद्ध मार्केट परिसरात पाणी साचून हा परिसर जलमय झाला. एकंदरीतच ही परिस्थिती पाहता नालेसफाई केल्याचा दावा करणाऱ्या उल्हासनगर महापालिका प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे.
गुरुवारी रात्रीपासून दमदार पावसाने उल्हासनगर शहरालाही चांगलेच झोडपून काढले. नालेसफाई योग्यरित्या झाली नसल्याने सखल भागात पाणी साचून नागरिकांचे मोठे हाल झाले. तर अनेक भागात रस्त्यांना नदीचे स्वरूप आले. शुक्रवारी सकाळपासूनच शहरातील मुख्य बाजारपेठेतील फर्निचर मार्केट, गजानन मार्केट परिसरात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. तर सम्राट अशोक नगर, फॉरवर्ड लाईन परिसरात तसेच धोबी घाट परिसरातही नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांची घरात शिरले पाणी काढता काढता चांगली दमछाक झाली.
दरम्यान, उल्हासनगरमधील प्रसिद्ध असलेले गजानन मार्केट आणि फर्निचर मार्केटकडे जाणार्या रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. यामुळे पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केल्याचा दावा करणाऱ्या उल्हासनगर महापालिका प्रशासन मात्र ही परिस्थिती बघून तोंडघशी पडल्याचे दिसून आले.