ठाणे: भाईंदर पश्चिम परिसरात सोमवारी सकाळी ९ : ३० च्या सुमारास बेकरी गल्ली जवळ एका केळी विक्रेत्याला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नागरिकांनी मध्यस्थी करत सदर मारहाण थांबवत केळीवाल्याला वाचवले आहे. केळी विक्रेत्याला मारहाण करणाऱ्या विरुद्ध भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे, तांत्रिकदृष्ट्या तपास करून आरोपीला अटक केली आहे.
केळी देण्यास नकार दिल्याने मारहाण: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये एका केळीवाल्याला मारताना दिसत आहे. केळी विक्रेत्याच्या हातगाडी वरून चार केळी मोफत खाण्यासाठी घेतली. त्यावेळी केळी विक्रेता सद्दाम हुसैन याने त्याला रोखले. तसेच जाब विचारलावर त्याला राग आला. खाण्यासाठी केळी देण्यास नकार दिल्याने त्याने केळी विक्रेत्याला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. हुसैन यांना लाथ मारत जमिनीवर ढकलले. त्यावेळी त्याचा शर्ट फाटून त्यात असलेले ३ हजार रोख रक्कम देखील गहाळ झाली होती. यामुळे केळी विक्रेता सद्दाम हुसैन यांनी भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्यात अनोळखी इसमा विरुद्ध कलम ३७९, ३२३, ४२७ व अपंग कायदा कलम ९२ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच भाईंदर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
ठाणे शहरात चिमुकल्याचे अपहरण: याआधीही ठाणे येथे १५ दिवसांपूर्वी भरदिवसा सहा महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. तपासात चिमुकल्याला दोन लाखात झारखंड राज्यातील नक्षलग्रस्त भागात एका महिलेला विकल्याचे उघडकीस आले होते. शांतीनगर पोलिसांनी शिताफीने अपहरणकर्त्यांचा शोध घेऊन एका महिलेसह दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या तावडीतून चिमुकल्याची सुखरूप सुटका केली. आरोपींना बेड्या ठोकल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे. अफरोज अबुबकर शेख (वय २५), शंभु सोनाराम साव (वय ५०), आणि मंजुदेवी महेश साव (वय ३४) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.