नवी मुंबई - वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये ( एक्झिबिशन सेंटर ) कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी तात्पुरते कोविड रुग्णालय उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाचा आढावा घेतला. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांना या रुग्णालयांमुळे कोरोनाविरुद्धच्या लढ्याला मोठे बळ मिळेल, असेही ते म्हणाले.
नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये कोविड रुग्णालयाची उभारणी होत आहे. तब्बल ११०० बेड्सच्या रुग्णालयात डायलिसिस सेंटर, लॅब, ऑक्सिजन, एक्स-रे अशा सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास वैद्यकीय क्षमता अपुरी पडू नये, यासाठी अनेक ठिकाणी तात्पुरती रुग्णालये उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नवी मुंबईतील वाशी येथे असणाऱ्या एक्झिबिशन सेंटरमध्ये कोविड रुग्णालय उभारण्याची तयारी आता नवी मुंबई मनपाने केली आहे. ही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या नव्याने उभारण्यात येणाऱ्या कोविड 19 रुग्णालयाची पाहणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
पालकमंत्र्यांनी नवी मुंबईत घेतली आढावा बैठक
पालकमंत्र्यांनी गुरुवारी नवी मुंबईत आढावा बैठक घेतली. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील या रुग्णालयांमुळे कोरोनाविरुद्धच्या लढ्याला मोठे बळ मिळेल. संपूर्ण एमएमआर परिसरात आवश्यक ती वैद्यकीय सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.