ठाणे - बकरी ईद या सणाचे औचित्य साधून सद्या ठाण्यात आगळ्या वेगळ्या पद्धतीने बकऱ्यांची विक्री सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने फैजअहमद शेख यांनी चक्क बोकडांचा रॅम्प शो भरवला आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी व पशुपालन वर्गाला प्रोत्साहन मिळावे यासाठीचा प्रसत्न
पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने ठाण्यात फैजअहमद शेख यांनी बोकडांचा रॅम्प शो भरवला आहे. शेख यांच्याकडून विविध जातीचे 32 बोकड विक्रीसाठी बाजारात उपलब्ध करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी व पशुपालन वर्गाला प्रोत्साहन मिळावे यासाठी फैजअहमद शेख या शेतकऱ्याने वेगळ्या पद्धतीने बकऱ्यांची विक्री करण्याचे ठरवले आहे.
शेतकऱ्यांचा जोड-धंदा म्हणून शेळीपालन हा एक व्यवसाय आहे. मात्र दलालांच्या विळख्यात अडकलेल्या या व्यवसायाला अधिक चालना मिळावी यासाठी शेख यांनी स्वतःच बकऱ्यांचे संगोपन करून मुंबई, ठाण्यासह शहरी भागात बकरी ईद निमित्ताने व्यवसाय करण्याचे ठरवले. यंदाचा हा पहिलाच प्रयोग असून, प्रत्येक बोकडांना वेगवेगळे नावे देण्यात आली आहेत.
शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या योजनांचा लाभ न घेता हे बकरे संगोपन करून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. संगोपन करण्यासाठी प्रत्येक बकऱ्यांच्या मागे 650 ते 700 रुपये खर्च येत असल्याचे फैजअहमद शेख यांनी सांगितले. कुठल्याही प्रकारची वजन वाढविण्याचे अनैसर्गिक औषधे न देता शेतीमध्ये उत्पादित केलेले गवत, धान्य, डाळी इत्यादी आहार देऊन पालन केलेले बोकड विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. ठाण्यातील बोकडांचा हा आगळावेगळा रॅम्प शो पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे.