ठाणे - आजपासुन सर्वत्र आपल्या सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. त्यामुळे, सर्वत्र आनंदचे वातावरण आहे. कसा असणार यंदाचा गणेशोत्सव? काय असणार या दहा दिवसांचे महत्व? कशी करायची गणरायाची मनोभावे पुजा? आणि काय आहे नेमकी या दहा दिवसांच्या मागची कथा... हे सांगितले आहे जेष्ठ पंचांगकर्ते दा कृ. सोमण यांनी...
मंगलकार्य किंवा कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात करताना विघ्नहर्ता म्हणजेच श्रीगणपतीची पूजा व आराधना करण्याची प्रथा आपल्याकडे अनेक वर्षांपासून सुरू आहे.
श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी प्रतिष्ठापना अशी करावी...
यंदा गणरायाचे आगमन २ सप्टेंबरला होणार आहे. सकाळी ४. ५६ मिनिटांपासून चतुर्थीचा आरंभ होत आहे. त्यानंतर मंगळवारी मध्यरात्री १.५३ मिनिटांनी ही तिथी संपणार आहे. पूजेचा मुहूर्त सकाळी ११ वाजल्यापासून ते दुपारी १. ४२ मिनिटापर्यंत असणार आहे. स्नान करुन घरातील देवांची पूजा करुन नंतर गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करावी.
गणपतीची स्थापना करण्याकरता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर. पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ, आंब्यांच्या डहाळी, सुपाऱ्या, पाण्याने भरलेला तांब्या, पळी, पंचपात्र, ताम्हण, समई, जानवे, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, प्रसादाकरता मोदक, मिठाई, पेढे, गोड पदार्थ गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रात: स्नानसंध्या पूजादी नित्यविधी करावेत.
(१) सोमवार, दि. २ सप्टेंबर २०१९
दिवस पहिला : आज श्रीगणेश चतुर्थी !
आज मध्यान्हकाळी भाद्रपद शुक्ल चतुर्थी आहे. त्यामुळे आजच पार्थिव गणेशमूर्तीची स्थापना करून षोडशोपचारे पूजन करावयाचे आहे. श्रीगणेश हा सुखकर्ता आहे, दु:खहर्ता आहे, विघ्नहर्ता आहे. श्रीगणेश हा चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती आहे. तो बुद्धिदाता, रंगभूमीचा कारक, नटेश्वर आहे. तो गणांचा अधिपती आहे, शूर आहे. गणपतीच्या या गुणांची ही पूजा असते. हे गुण आपल्या अंगी यावेत यासाठी गणेश पूजन करावयाचे असते. कृतज्ञता व्यक्त करणारी ही पृथ्वीची पूजा असते. बाप्पामुळे आप्तेष्ट-मित्र एकत्र येतात.
(२) मंगळवार, दि. ३ सप्टेंबर २०१९
दिवस दुसरा: ऋषिपंचमी !
मंगळवारी भाद्रपद शुक्ल पंचमी ! श्रीगणेश बाप्पाच्या आगमनानंतरचा दुसरा दिवस ! या दिवशी गणपतीचे वाहन उंदीर याची पूजा केली जाते. गणपतीला २१ दुर्वा वाहून २१ मोदकांचा नैवेद्य अर्पण करतात. या दिनी दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन असते. घरात प्रसन्न, पवित्र वातावरण असते. लाडका बाप्पा घराघरात सुख आणतो. दु:ख नाहिसे करतो, इथे सर्वत्र श्रद्धेचे दर्शन घडते. आजच्या दिवशी ऋषिपंचमी व्रत करावयाचे आहे, ऋषिपंचमीला महिला उपवास करतात. बैलाच्या मेहनतीचे अन्न ग्रहण करीत नाहीत. या दिवशी सर्व संतमहंतांच्या शिकवणुकीचे स्मरण करावयाचे आहे.
(३) बुधवार, दि. ४ सप्टेंबर २०१९
दिवस तिसरा : सूर्यष्ठी !
बुधवारी भाद्रपद शुक्ल षष्ठी ! सूर्यषष्ठी ! आहे. या दिवशी स्नान, दान, जप असे व्रत करतात. सूर्याची पूजा करतात. हा श्रीगणेश स्थापनेनंतरचा तिसरा दिवस ! बाप्पाची पूजा, आरती, अथर्वशीर्ष पठण करतांना सर्वजण गणेशभक्तीत तन्मय होतात. घराघरात मंगल - प्रसन्न वातावरण निर्माण होते. माणसे दु:ख, चिंता विसरून आनंदाचे धनी होतात.
गणपतीला लाल फुले, शमी आणि मंदार जास्त प्रिय आहेत. गणेश हा मातृभक्त आहे. २१ मातृदेवता आहेत. म्हणून २१ अंक श्रीगणेशाला जास्त प्रिय आहे. गणेश हा गणांचा नायक आहे. नेतृत्वगुणांचा तो आदर्श आहे.
(४) गुरुवार, दि. ५ सप्टेंबर २०१९
दिवस चौथा : गौरी आवाहन !
गुरुवारी भाद्रपद शुक्ल सप्तमी ! अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरींचे आगमन होते. या दिनी उत्तररात्री ४-०८ वाजेपर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात राहील. त्यामुळे दिवसभरात कधीही ज्येष्ठा गौरी आणाव्यात. परंपरेप्रमाणे काही खड्याच्या गौरी आणतात, काही मुखवट्याच्या गौरी आणतात. काही लोक गौरीच्या मूर्ती आणतात, तर काही लोक तेरड्याच्या गौरी आणतात. गौरी म्हणजे माता पार्वती ! या दिवशी सासरी गेलेल्या मुली माहेरी येतात. माता गौरी व पुत्र श्रीगणेश यांची भेट होते. मातृभक्तीचे दर्शन होते. यांच्या आगमनामुळे घर आनंदाने श्रीमंत झालेले असते. सुखी झालेले असते.
(५) शुक्रवार, दि. ६ सप्टेंबर २०१९
दिवस पाचवा : गौरीपूजन !
भाद्रपद शुक्ल अष्टमी ! दुर्गाष्टमी ! या दिवशी चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात येत आहे. या दिनी ज्येष्ठा गौरीचा मान असतो. त्यामुळे, या दिवशी माता गौरी आणि पुत्र श्रीगणेश यांची पूजा करायची असते. परंपरेप्रमाणे गोड नैवेद्य अर्पण करायचा असतो. गौरीमाता आणि पुत्र गणेश घराघरात सौख्य आणीत असतात. प्रेमाची साक्ष घडवीत असतात, माहेरी आलेल्या लेकीला आई तिच्या आवडीचे गोडपदार्थ जेवू घालते. हा दिवस महिलांच्या दृष्टीने विशेष आनंदाचा असतो. घराघरात आजी, आई, बहीण, मुलगी, सून यांच्या रूपात गौरीच वावरत असते, त्यांचाच सन्मान असतो.
(६) शनिवार, दि. ७ सप्टेंबर २०१९
दिवस सहावा : गौरी विसर्जन !
हा दिवस भाद्रपद शुक्ल नवमीचा ! या दिवशी 'अदु:ख नवमी’ व्रत करावयाचे असते. या दिवशी संपूर्ण दिवस चंद्र मूळ नक्षत्रात आहे. मूळ नक्षत्रातच ज्येष्ठा गौरींचे विसर्जन करावयाचे असते. परंपरेप्रमाणे ज्येष्ठा गौरींबरोबर गणेशमूर्तींचेही विसर्जन केले जाते. माता पार्वती आपल्या पुत्राला बरोबर घेऊन निरोप घेतांना सर्वांना आशीर्वाद देत असते. उत्सव हे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी असतात, भक्षण करण्यासाठी नव्हे. उत्सव साजरे करीत असतांना जलप्रदूषण, वायूप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण होता कामा नये. गौरी-गणपतीची हीच खरी शिकवण असते. आपण निसर्गाला जपलेच पाहिजे.
(७) रविवार, दि. ८ सप्टेंबर २०१९
दिवस सातवा : भागवत सप्ताहारंभ !
भाद्रपद शुक्ल दशमी ! या दिनी श्रीमद्भागवत ग्रंथ पारायण सप्ताहाचा प्रारंभ करायचा असतो. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे ही शिकवण व्यास महर्षी भागवत ग्रंथाद्वारे देतात. गणेशस्थापनेपासूनचा हा सातवा दिवस. गणेशाची आरती टाळं मृदंगाच्या साथीने केली जाते. समर्थ रामदासांनी रचलेली 'सुखकर्ता-दु:खहर्ता' ही आरती सर्वानाच पाठ असते. 'संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे' अशी विनवणी भक्त श्रीगणरायापाशी करीत असतात. बुद्धिदात्यापाशी रक्षणाची प्रार्थना करीत असतात. हातून चुका होऊ देणार नाही याची शपथ घेत असतात.
(८) सोमवार, दि. ९ सप्टेंबर २०१९
दिवस आठवा : परिवर्तिनी एकादशी !
भाद्रपद शुक्ल एकादशी ! परिवर्तिनी एकादशी ! पर्जन्यवृष्टीमुळे आणि गणेशभक्तीमुळे संपूर्ण वातावरणात परिवर्तन झालेले असते. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. वसुंधरेच्या या देणगीबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करीत असतो. पर्यावरण रक्षण करून पृथ्वीचे ऋण आपण फेडण्याचा प्रयत्न करीत असतो. श्रीगणेश म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचशक्ती आहे. गणपतीस प्रिय असणारे, बुद्धी स्थिर करणारे अथर्वशीर्ष आपण पठण करीत असतो. गणेश सहस्र नामावली म्हणत मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करीत असतो.
(९) मंगळवार, दि. १० सप्टेंबर २०१९
दिवस नववा : वामन जयंती
भाद्रपद शुक्ल द्वादशी ! वामन जयंती ! बाप्पाच्या आगमनाला ९ दिवस झालेले असतात. दु:ख, चिंता, काळजी सारेच विसरलेले असते. आनंद, उत्साह, भक्तीमय, प्रसन्न वातावरण झालेले असते. आबालवृद्ध श्रीगणेशाच्या चरणी लीन होतात. द्वेष, मत्सर, लोभ यांचा लय झालेला असतो. प्रेम, आपुलकी, त्याग यांचेच दर्शन घडते. विद्या-कलांच्या अधिपतीचेच राज्य असते. प्रत्येकाचा तो राजाच असतो. परिसर आणि मन दोन्हीही स्वच्छ राखले जातात. गणपती बाप्पामुळेच आप्तेष्ट, मित्रमंडळी एकत्र येत असतात. आनंद द्विगुणित होत असतो.
(१०) बुधवार, दि. ११ सप्टेंबर २०१९
दिवस दहावा : पक्ष प्रदोष !
भाद्रपद शुक्ल त्रयोदशी ! पक्षप्रदोष व्रत ! उद्या गणपती बाप्पाला निरोप द्यायचा, वातावरण भावुक होते. लाडक्या गणेश बाप्पाची पूजा, आरती, मंत्रपुष्पांनी संपूर्ण परिसर मंगलमय, पवित्र व प्रसन्न झालेला असतो. पुरुष, महिला, मुले सर्वांची लगबग सुरू असते. प्रत्येकजण गणेशाची प्रार्थना करीत असतात. मनींचे मागणे मनात प्रकट करीत असतात. नवीन चांगल्या गोष्टी करण्याचा निश्चय करीत असतात. उत्सवाचा आनंद आणि बाप्पाचा विरह दोन्हींचा मिलाप झालेला असतो. मन प्रसन्न होते. कर्तव्यपूर्तीची भावनाही असते. नवा उत्साह संचारलेला असतो.
(११) गुरुवार, दि. १२ सप्टेंबर २०१९
दिवस अकरावा : अनंत चतुर्दशी !
भाद्रपद शुक्ल चतुर्दशी ! अनंत चतुर्दशी ! आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा विरहाचा दिवस. अनंत चतुर्दशीचे एक व्रत आहे. कधी कधी पौर्णिमेच्या दिवशीच महालयारंभ असतो. पितृपक्ष सुरू होतो, म्हणून गणेशमूर्ती विसर्जनाचा आजचा शेवटचा दिवस असतो. आपण विसर्जनापूर्वी उत्तरपूजा करून मूर्तीमधील देवत्व काढून घेत असतो. आपण गणपतीचे विसर्जन करीत नसतो. मूर्तीचे विसर्जन करतो, नम्र होऊन प्रार्थना करतो. काही चुकले- माकले तर त्याची क्षमा मागतो. एकच जयजयकार असतो. “ गणपती बाप्पा मोरया ! पुढच्यावर्षी लवकर या ! “