ठाणे - साखरपुडा झाल्यानंतर लग्नासाठी हुंड्याची मागणी करत लग्नास नकार दिल्याने हतबल झालेल्या तरुणीने वडिलांसह न्याय मागण्यासाठी किन्हवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलीस निरीक्षक फेगडे व पोलीस हवलदार अगिवले यांनी त्यांना तक्रार न घेताच पोलीस ठाण्यातून हकलून लावल्याचा आरोप, तरुणीने केला असून तिने कुटुंबासह पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांविरोधातच आमरण उपोषण सुरू केले आहे.
शहापूर तालुक्यातील चेरपोली गावातील कविता फर्डे या तरुणीचा मुरबाड तालुक्यातील नागांव येथील प्रविण हरड या तरुणासोबत १० फेब्रुवारीला साखरपुडा झाला होता. मात्र, साखरपुडा झाल्यानंतर लालची प्रवीणने मुलीच्या घरच्यांकडे हुंड्याची मागणी केली, असा आरोप पीडित मुलीने केला आहे. तसेच किन्हवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अरुण फेगडे व पोलीस हवालदार विलास आगीवले हे प्रवीणला पाठिशी घालत आहेत. पीडितेला न्याय देण्याचे सोडून उलट मुलीला व तिच्या वडिलांना आतमध्ये टाकू, अशी धमकी दिली आणि तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोपही पीडित तरुणीने केला आहे.
पीडित मुलीच्या नातेवाईकांनी न्याय मागण्यासाठी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक राठोड यांची भेट घेवून हा सर्व प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर पोलीस अधिक्षकांनी प्रकरणाची दखल घेऊन शहापूर डिवायएसपी दिलीप सावंत यांना या प्रकरणाची चौकशी करून तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर किन्हवली पोलीस ठाण्यातील गुन्हा शहापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. मात्र, तब्बल एक महिना उलटूनही किन्हवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे व त्यांचा लिपिक विलास आगीवले यांनी पीडितांना न्याय न देता केवळ त्यांचा मानसिक छळ करून धमकावल्याचा आरोप तरुणीने केला आहे. तसेच आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ करीत असल्याने या दोन्ही पोलिसांवर कारवाईसाठी आणि आरोपीच्या अटकेसाठी पीडित मुलीने किन्हवली पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
किन्हवली पोलीस ठाणे अंतर्गत मागील २ महिन्यात साखरपुडा होऊन लग्न मोडल्याच्या साधारणपणे ५ घटना घडल्या आहेत. यामध्ये पीडितांना न्याय न मिळता त्यांच्यावरच अन्याय होत असून आरोपींना पाठीशी घालण्याचे काम किन्हवली पोलीस ठाण्यात घडत असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.