ठाणे - ओएलएक्सवर लॅपटॉप विक्रीची जाहिरात पाहून खरेदीच्या बहाण्याने दोघांनी एका व्यक्तीची फसवणूक केली. कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. आरोपींनी लॅपटॉप खरेदी करायचा आहे असे सांगत फिर्यादीला २ लाख ३० हजार रुपयांचा धनादेश बँकेत चेक वटवण्यासाठी पाठवले. त्यानंतर त्यांनी लॅपटॉप घेऊन पोबारा केला. पोलिसांनी या प्रकरणी मालाड आणि विरार येथून दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून लॅपटॉप हस्तगत करण्यात आला.
काय आहे प्रकरण -
फिर्यादी प्रकाश श्रीधर हेगडे यांनी मुलासाठी लॅपटॉप घेतला होता. तो त्यांना विकायचा होता म्हणून त्यांनी ओएलएक्सवर पोस्ट टाकली. त्याची किंमत २ लाख ३० हजार रुपये असल्याचेही पोस्टमध्ये टाकण्यात आले होते. लॅपटॉप विकत घेण्यासाठी आलेल्या दोन भामट्यांनी धनादेश देऊन त्यांची फसवणूक केली व पोबारा केला. फिर्यादी हेगडे यांनी याबाबत कासारवडवली पोलीस ठाण्यात दोघा आरोपींवर गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी सहायक पोलीस निरीक्षक सहदेव पालवे यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार केली. तांत्रिक तपास आणि खबऱ्याच्या माहितीनुसार पोलीस पथकाने पीटर उर्फ रॉईस जॉश सॅनवेस (वय ३०) रा. मालवणी मालाड मुंबई आणि आरोपी सिद्धेश साईनाथ सावंत(वय ३०) रा. विरार जि -पालघर याला अंधेरी येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी तो लॅपटॉप हा लॅमिंग्टन रोड मुंबई येथे विक्री केल्याचे समजले. त्याठिकाणी जाऊन पोलीस पथकाने २ लाख ३० हजार रुपयांचा लॅपटॉप हस्तगत केला. पोलीस पथकाने आरोपींनी गुन्ह्यात वापर केलेल्या मोबाईलच्या सहाय्याने आरोपींना अटक केली.
ओएलएक्सवर खरेदी-विक्री करताना सावधान रहा -
ओएलएक्सवर कमी किमतीमध्ये मिळणाऱ्या वस्तूंना बळी न पडता, या वस्तू प्रत्यक्ष जाऊन-पाहूनच खरेदी कराव्यात. खरेदी करताना सुद्धा योग्य ती खबरदारी घ्यावी आणि मगच व्यवहार पूर्ण करावा, असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे. ठाण्यात अशा प्रकारच्या अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे ओएलएक्सवर खरेदी करताना अॅडव्हान्स न देणे, चेकचा व्यवहार टाळणे आणि सामानाची योग्य तपासणी करूनच व्यवहार करावेत, असेही पोलिसांनी सांगितले आहे.