ठाणे - भिवंडीतून विदेशात जाणाऱ्या २ कोटी रुपयांच्यावर बेडशीट चोरीचा नारपोली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कंटेनरच्या सहाय्याने भिवंडीतून न्हावाशेवा बंदरापर्यत सीलबंद असलेल्या बेडशीटचे बॉक्स जलवाहतूक मार्गाने विदेशात पाठवण्यात येत होते. मात्र, भिवंडी ते न्हावाशेवा पोर्ट दरम्यानच चोरटे कंटेनरमधून बेडशीटचे बॉक्सकाढून त्या बॉक्समध्ये तेवढ्याच वजनाचे दगड भरून विदेशात पाठवत असल्याचे पोलीस तपासात समोर आले.
याप्रकरणी चार आरोपींना नारपोली पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी १ कोटी ९२ लाख रुपयांचे बेडशिटचे बॉक्स हस्तगत केले आहेत. भिवंडीचे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली. सर्फराज मोहम्मद युनूस अन्सारी, (वय ४५, रा.गोवंडी प. मुंबई ) मोहम्मद फारूक मोहम्मद यासीन कुरेशी, (वय ४६ रा. गोवंडी प. मुंबई) मोहम्मद रिहान मोहम्मद नबी कुरेशी, (वय २९, रा. मुरादाबाद, उत्तरप्रदेश. मोहम्मद मुल्तजीम मोहम्मद हजिम कुरेशी, (वय ३०, मुरादाबाद, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे असून चौघेही उत्तर प्रदशेचे रहिवासी आहेत. गुन्हा करून ते आपल्या मूळगावी पळून गेले होते. मात्र, पोलिसांनी आरोपींचे मोबाईल लोकेशन व वाहनातील जीपीएस सिस्टमच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला.
विदेशात बेडशीटचे बॉक्स पोहचल्यानंतर उघडकीस आला प्रकार -
यंत्रमाग नगरी म्हणून भिवंडी शहराची ओळख असून येथील विविध कपड्यांना विदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अशाच एका विदेशी कंपनीने भिवंडीतील काल्हेर भागात असलेल्या भरत श्याम मल्होत्रा व सचिन सज्जन झुनझुनवाला या दोन यंत्रमाग कंपनीच्या मालकांना विदेशातील एका कंपनीने २ कोटी रुपयांच्या बेडशीट्सची ऑर्डर दिली होती. त्याप्रमाणे यंत्रमाग मालकाने बेडशीट्स तयारकरून पॅकिंगकरत ट्रेलरद्वारे सिलबंद कंटेनरमध्ये ते न्हावाशेवा पोर्ट बंदर येथे पाठवले. त्यामध्ये १ कोटी २६ लाख ९९ हजार ८०९ रुपयांचे बेडशीट्स बॉक्स २० ऑक्टोबर आणि १० नोव्हेंबरला १ कोटी १५ लाख रुपयांच्या बेडशीट्सचे बॉक्स भिवंडीहून न्हावाशेवा पोर्टला रवाना केले होते. हे बेडशीट्सचे बॉक्स विदेशात आठ दिवसानंतर ऑर्डर देणाऱ्या कंपनीत पोहचले. त्यावेळी बॉक्समध्ये बेडशीट ऐवजी दगडी भरलेले आढळून आले होते. तेथील कंपन्यांच्या मालकांने भिवंडीतील बेडशीट तयार करणाऱ्या कंपनीच्या मालकांना ही गंभीर बाब निदर्शनास आणून दिली. त्यांनतर दोन्ही मालकांनी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
चोरीच्या सहभागात कंटेनर चालक -
दोन्ही कंटेनर चालक व इतर दोन आरोपी असलेले हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. सर्वच उत्तर प्रदेशमधील आसपासच्या गावात राहणारे आहेत. आपला गुन्हा उघडकीस येईल या भीतीने त्यांनी बेडशीटचे बॉक्स वसईमध्ये तर काही मूळगावी गोदामात लपून ठेवले होते. मात्र, पोलिसांनी तपासकरून या चारही आरोपींना शिताफीने अटक केली आहे. जगभरात सुरू असलेल्या कोरोना आजारामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामात परदेशात माल निर्यात करणाऱ्या भारतीय व्यापाऱ्यांची प्रतिमा या प्रकारामुळे मलीन झाली होती. सध्या सर्व आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांनी अशा प्रकारचे इतर गुन्हे केले असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता आणखी गुन्हे देखील उघड होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली.