ठाणे - राज्यात विक्री करण्यास बंदी असलेला लाखोंचा विदेशी मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा भागात जप्त केला आहे. पथकाने पाठलाग करून पकडलेल्या टेंपोमध्ये कच्चा धाग्याच्या बंडलांखाली लपवलेले मद्याचे ४४५ बॉक्स आढळून आले असून या मुद्देमालाची किंमत ४६ लाख ५६ हजार असल्याची माहिती निरिक्षक आनंदा कांबळे यांनी दिली. याप्रकरणी, टेंपोचालक राजेशकुमार यादव याला ताब्यात घेतले असून हा मद्यसाठा गुजरातमध्ये जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
वाहतूक करणारा टेम्पोही जप्त -
अवैध, नकली आणि परराज्यातून येणाऱ्या मद्यावर कारवाई करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्काचे आयुक्त के.बी. उमाप यांनी दिले आहेत. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे दुय्यम निरिक्षक अनिल राठोड व अनंता पाटील आदींनी मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा येथे पाळत ठेवून होते. त्यावेळी या पथकाला नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावर एक संशयास्पद टाटा कंपनीचा टेम्पो जाताना दिसला. त्या टेम्पोचा पाठलाग करून त्याला या पथकाने थांबवले. या टेम्पोची पाहणी केली असता, या टेम्पोमध्ये दादरा-नगर-हवेलीतून राज्यामध्ये विक्रीस आणलेल्या विदेशी मद्याचे ४०० हून अधिक खोके जप्त केले. तसेच ही वाहतूक करण्यासाठी वापरलेला टेम्पोही उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला.
हेही वाचा - काँग्रेसच्या विरोधाला न जुमानता मुख्यमंत्री कार्यालयाकडून संभाजीनगर नावाचा वापर सुरूच