ठाणे - परदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्र पर्यटन विभागाने सुरू केलेल्या बोटीवरील तरंगत्या हॉटेलची मेजवानी पर्यटकांना ठाण्यात अनुभवता येणार आहे. लवकरच या प्रकल्पाला सुरुवात होणार असून ठाण्याच्या गायमुख खाडीजवळ तरंगते हॉटेल सुरू होणार आहे. राज्य शासनाच्या नियमांच्या अधिक राहून हे हॉटेल लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी एक जेट्टी दाखल झाली असून सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणेकरांना आता तरंगते हॉटेलची मेजवानी अनुभवता येणार आहे.
गोव्याप्रमाणेच महाराष्ट्रातही पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईत पहिल्या तरंगत्या हॉटेलची संकल्पना मांडण्यात आली होती. ही संकल्पना मुंबईमध्ये अंमलात आणली होती. मात्र, टाळेबंदी व निर्बंधामध्ये या तरंगत्या हॉटेलची सफर बंद करण्यात आली होती. मात्र, आता ठाण्याच्या गायमुख खाडीजवळ सुरुवात होणार असून ठाणेकरांना आगळा-वेगळा अनुभव या लवकरच मिळणार आहे.
गायमुख येथे या तरंगत्या हॉटेलमधून एकबाजूला खाडी आणि दुसऱ्या बाजूला डोंगराळ भाग असा नयनरम्य निसर्ग आहे. या संकल्पनेतून पर्यटन स्थळांना नवा लूक देण्यात येणार आहे. द. सी.फ्लोटिंग रेस्टॉरंट या खासगी कंपनीने हे हॉटेल सुरू केले आहे. ही संकल्पना महाराष्ट्र शासनाने मांडली आहे. एकीकडे चौपाट्यांचा विकास करण्याचा बिग बजेट प्रकल्प हाती असतानाच ठाण्यातील गायमुख खाडीत तरंगणारे हॉटेल ठाणेकरांना आणि पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे.
एका वेळी 100 पर्यटक घेऊ शकतात आनंद
महाराष्ट्र मेरिटाईन बोर्डने परवानगी दिली असून या जहाजमध्ये सध्या तरी 100 पर्यटक बसू शकतात. ठाण्यात प्रथमच खाडीकिनारी फ्लोटिंग रेस्टॉरंट अशी नवीन संकल्पना अमलात येत आहे. तसेच यामध्ये पर्यकटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आली असून लाईफ गार्ड, सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही केमेरे तसेच अनेक सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
हेही वाचा - ठाण्यातील इलेक्ट्रॉनिक मार्केटला लागलेली आग नियंत्रणात