ठाणे - एका चायनीज खाद्य पदार्थाच्या गाडीवरील पैशाचा गल्ला पळविण्याच्या वादातून गाडी मालकासह पाच जणांच्या टोळक्याने 32 वर्षीय तरुणाची भररस्त्यात हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका परिसरातील मेट्रो हॉटेलजवळ घडली आहे. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात हत्येसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून 5 जणांना अटक केली आहे.
आरोपीमध्ये तिघा बाप लेकांचा सहभाग
अफजल नूरमोहम्मद सिद्धीकी (वय 27 वर्षे), अफसर नूरमोहम्मद सिद्धीकी (वय 26 वर्षे), मो. बशीर अन्सारी (वय 28 वर्षे), नूरमोहम्मद मकदूमबक्ष सिद्धीकी उर्फ पुरीभाजीवाला उस्ताद (वय 64 वर्षे), असे हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे आरोपीमध्ये अफजल, अफसर हे सख्खे भाऊ असून नूरमोहम्मद सिद्धीकी हे त्या दोघांचे वडील आहेत. अशा तिघा बाप लेकांचा सहभाग असून तिघेही भिवंडीतील नदीनाका भागात राहणारे असून आरोपीमध्ये एक साडे चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. तर शफिक महबूब शेख (वय 32 वर्षे), असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो भिवंडीतील म्हाडा कॉलनी परिसरात राहत होता.
रस्त्यावरच पकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण
आरोपी अफजल याचे मेट्रो हॉटेल जवळ असलेल्या अबूजी बिल्डिंग समोर चायनीजची खाद्य पदार्थाची गाडी आहे. या गाडीवर सोमवारी (दि. 25) सव्वा अकराच्या सुमारास शफिक हा आला होता. त्यावेळी त्याने चायनीज गाडीवरील काम करणाऱ्या कारागिराशी वाद घातला. त्यांनतर गाडीवरील पैशाचा गल्ला पळवला. त्यावेळी पाचही आरोपींनी मृत शफिकला रस्त्यावरच पकडून त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
हत्येमुळे परिसरात तणाव
मारहाणीनंतर शफिकला भिवंडीतील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यामुळे मृत शफिकच्या नातेवाईकांनी घटनस्थळी गोंधळ घातला होता. या मारहाणीत शफिकचा मृत्यू झाल्याचे समजताच परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आणून निजामपूर पोलिसांनी पंचनामा करत हत्येसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून आज (दि. 26) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पाचही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
शहरात पाचशेपेक्षा अधिक चायनीज विक्रेते
भिवंडी शहर यंत्रमाग नगरी असल्याने शहरातील विविध भागात हजारो यंत्रमाग यंत्रांची धडधड सुरूच असते. त्यामुळे कामगारांसाठी पहाटेपर्यंत बहुतांश भागात हॉटेल व खाद्यपदार्थाच्या हातगाड्या सुरू ठेवल्या जातात. विशेष म्हणजे भिवंडी शहरातील विविध भागात सुमारे पाचशेपेक्षा अधिक बेकायदा चायनीज सेंटर व हातगाड्या असल्याने अशा या सेंटर आणि हातगाडीवर नेहमीच शुल्लक कारणावरून वाद होऊन हाणामारीचे प्रकार घडतात. त्यामुळे अशा बेकायदा चायनीज विक्री करणाऱ्यावर कारवाईची मागणी शहरातील नागरिक करत आहेत.
हेही वाचा - तळोजा एमआयडीसीमधील मोकळ्या गोडाऊनला भीषण आग