ठाणे : ठाण्यात वाहन पार्किंग (Vehicle Parking Arrangement Thane) करण्याचे पालिकेचे ठोस नियोजन नाही. त्यात कोरोनामुळे आर्थिक डबघाईला आलेल्या ठाणेकरांवर आता नव्या आर्थिक बोज्याचे संकट येणार आहे. ठाणे वाहतूक शाखेमार्फत टॉविंग व्हॅन सुरू (start towing van Thane) करण्यात येत आहे. याला ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते महेश कदम यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. सामाजिक कार्यकर्ते महेश कदम (social workers Mahesh Kadam) हे ठाण्यात हातात फलक घेऊन ठाणेकरांनो जागे व्हा, अशी जनजागृती करत आहेत.
प्रथम पालिकेने पार्किंग धोरण राबवावे - हातात फलक घेऊन ठाणे महापालिका मुख्यालयाबाहेर आलेल्या महेश कदम यांनी ठाणे शहराची लोकसंख्या वाढत चालली आहे. वाहनांची संख्या वाढत चाललेली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने पार्किंगचे धोरण राबविणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे फेरीवाला धोरण राबविण्यात आले. त्याच प्रमाणे प्रथम पालिकेने पार्किंग धोरण राबवावे आणि त्यानंतर टॉविंग धोरण राबवावे, अशी मागणी केली आहे. कारण महामारीनंतर आता ठाणेकरांच्या खिशाला चाट बसणार आहे. प्रथम सुविधा द्या आणि नंतर नियमाचे उल्लंघन केले म्हणून दंडात्मक कारवाई करा, अशी मागणी केली. यासाठी ठाणेकरांनी जागे व्हावे अशी अपेक्षाही देखील कदम यांनी व्यक्त केली.