ठाणे - उल्हासनगरात गुरुनानक जयंतीनिमित्ताने काढलेल्या मुरवणुकीत हवेत गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना अमृतवेला ट्रस्टने काढलेल्या मिरवणुकीत घडली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर शहरातील नेटकऱ्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारात कोणालाही दुखापत झाली नाही. याप्रकरणी पर्यावरणवादी संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यानी नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - भिवंडी महापालिकेत महिला महापौर आरक्षणामुळे सत्ता समीकरणांना वेग ; आर्थिक घोडेबाजार रंगणार !
उल्हासनगरात गुरुनानक जयंतीनिमित्त अमृतवेला ट्रस्टने शहरात प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत अमृतवेला सत्संगचे रिंकू भाईसाहब यांनी हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. संपूर्ण मिरवणुकीत अनेकदा गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे मिरवणुकीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यावेळी मिरवणुकीत काही पोलिसांच्या समोरच हवेत गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलिसांनी हवेत गोळीबार करणाऱ्याला रोखू शकले नाही.
दरम्यान, राज्यात राजकीय अस्थिरता कायम असल्याने राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली असतानाच हा धक्कादायक प्रकार समोर आला. या गोळीबाराच्या घटनेत कुणाला दुखापत झाली असती, किंवा एखाद्याचा जीव गेला असता त्यानंतरच पोलिसांनी कारवाई केली असती का? असा प्रश्न पर्यावरणवादी संघटनेच्या सरिता खानचंदानी यांनी उपस्थित केला आहे.