ठाणे - ज्वालामुखीचा तालुका समजल्या जाणाऱ्या भिवंडीत अग्नी तांडव सुरूच आहे. आज पहाटेच्या सुमाराला पुन्हा भल्यामोठ्या भंगार साठवलेल्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही घटना भिवंडीतील कणेरी गावातील समदनगर येथील भंगारांच्या गोदामाला लागली. अग्निशामक दलाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश मिळाले आहे.
भिवंडी शहरातील समदनगर या परिसरातील दाटीवाटीच्या नागरी वस्तीत एक बंद पडलेला यंत्रमाग कारखाना आहे. या ठिकाणी भंगार गोदाम उभारण्यात आले आहे. या गोदामात धाग्याचे कोम, कपड्याच्या तुकड्यांसह प्लास्टिक, पुठ्ठा व यंत्रमागाचे भंगार मोठ्या प्रमाणावर साठवण्यात आले आहे. त्यातच शनिवारी पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास या भंगर गोदामाला अचानक आग लागली. या आगीची घटना भिवंडी अग्निशामक दलाला मिळताच दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
आगीची व्याप्ती पाहता कल्याण, ठाणे, अग्निशामक दलाच्या गाडीस पाचारण करावे लागले. ४ पाण्याच्या टँकरच्या मदतीने ही आग ५ तासाने आटोक्यात आली. मात्र कापूस, कपडा धागा असल्याने ही आग धुमसत असून, आगीवर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी सध्या याठिकाणी कुलींगचे काम सुरु आहे. सुदैवाने या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे भंगार जळून खाक झाले असून, आगीचे कारण अध्याप समजू शकले नाही.