ठाणे - येथील भिवंडी तालुक्यातील वळगावच्या हद्दीतील अंजुर फाटा जवळील प्रेरणा केमीकल गोदामाला गायत्री कंपाउंडमध्ये रसायनाच्या गोदामाला सोमवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. आग इतकी भीषण होती की, यामध्ये आतापर्यंत ६ ते ७ गोदामे जळून खाक झाली आहेत.
यानंतर सदर घटनास्थळी ठाणे अग्नीशमन केंद्राचे १-फा. वा., १-वॉटर टँकर, भिवंडी अग्निशमन केंद्राचे २-फा. वा., १-वॉटर टँकर व कल्याण अग्निशमन केंद्राचे १-फा. वा. उपस्थित झाले आहेत. आग भीषण स्वरूपाची असल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे १२ तासाचा अवधी लागण्याची शक्यता अग्निशमन दलाच्या जवानांनी वर्तवली होती. मात्र, सदरची आग १० वाजेच्या सुमारास नियंत्रणात आली आहे. सदर घटनेत अद्यापतरी कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही, अशी माहिती भिवंडी आपत्ती व्यवस्थापन कक्षातून मिळाली आहे.
रसायने साठवलेल्या लगतच्या गोडाऊनमध्ये डांबर साठवले होते. हे डांबर भीषण आगीमुळे वितळून बाहेर रस्त्यावर आले आहे. त्यावर पाण्याचा मारा करून कुलिंग करण्यात येत आहे. विशेष म्हणजे आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. तर पाण्याची कमतरता भासत असल्याचेही दिसून येत आहे. परिसरातील नागरिकांना घटनास्थळी जाण्यासाठी पोलिसांनी मनाई केली आहे.
तर याठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. तब्बल साडेआठ तासानंतर या आगेवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे. मात्र, तरीही कुलिंगचे काम सायंकाळपर्यत सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.