ठाणे - डोंबिवली औद्योगिक वसाहतीतील फेज-२ मधील 'मेट्रोपॉलिटिन एक्सिम लिमिटेड' या रसायन कंपनीला मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. कंपनीत असलेले रसायन साठवून ठेवलेले शेकडो ड्रम या आगीच्या भक्षस्थानी सापडले. त्यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळा येत आहे. या भीषण आगीची झळ शेजारच्या कंपन्यांनाही बसली आहे. या आगीत ही कंपनी पूर्णतः बेचिराख झाली आहे. आग लागून 10 तास होत आले तरीही अग्निशामक दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ही आग संपूर्णपणे विझण्यासाठी बुधवारची दुपार उजाडेल, अशी माहिती कल्याण-डोंबिवली अग्निशामक दलाचे मुख्य अधिकारी दिलीप गुंड यांनी दिली.
आग लागल्याचे समजताच कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी बाहेर पळ काढला. यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याबाबत माहिती मिळाल्यानंतर सुरुवातीला कल्याण-डोंबिवलीतील 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, रसायनाचे ड्रम फुटून आगीची तीव्रता वाढल्याने भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, ठाणे येथील अग्निशामक दलाच्या १० ते १५ गाड्या बोलवण्यात आल्या. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. आगीची भीषणता पाहता खबरदारीचा उपाय म्हणून आजूबाजूच्या कंपन्या, रहिवासी इमारती रिकाम्या करण्यात आल्या. या परिसरातील शाळाही सोडून देण्यात आल्या. रस्त्यावर सर्वत्र धूर पसरल्याने कल्याण-शिळ मार्गही काही तास बंद करावा लागला होता. आगीची भीषणता पाहता एनडीआरएफची एक तुकडीही घटनास्थळी दाखल झाली आहे.
दरम्यान आगीची माहिती मिळताच आमदार रविंद्र चव्हाण, प्रमोद पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्याची परिस्थिती पाहता अग्निशामक दलाच्या गाड्या या ठिकाणी रात्रभर ठेवण्याच्या सूचनाही महापालिका आयुक्तांनी दिल्या आहेत. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
हेही वाचा - चाकणमध्ये वर्कशॉप मालकाची दगडाने ठेचून हत्या; हल्लेखोर फरार
आगीमुळे रसायनाच्या धुरामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. आग आटोक्यात आणणाऱ्या अग्निशामक दलाच्या जवानांच्या अंगावर फुटलेल्या ड्रममधून रसायन उडत असल्याने, त्यांनाही या आगीचा त्रास होत आहे. आगीच्या भक्षस्थानी सापडलेली मेट्रोपॉलिटिन एक्सिम लिमिटेड कंपनी ही डोंबिवलीतील पाच अतिधोकादायक असलेल्या कंपन्यांपैकी एक आहे.
डोंबिवलीतील धोकादायक कंपन्यांचे स्थलांतर करा, अशी मागणी मागील दहा ते बारा वर्षांपासून स्थानिक नागरिक राज्य शासनाकडे करत आहेत. काही दिवसांपूर्वीच डोंबिवली एमआयडीसीमधील रस्ते रसायनामुळे गुलाबी झाले होते. त्याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे डोंबिवलीत आले होते. त्यावेळीही घातक कंपन्या स्थलांतरीत कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली होती. ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली होती. मात्र, काही राजकीय नेत्यांनी आणि कारखानदारांनी मिळून कामगार बेकार होतील, असे सांगत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
वारंवार लागणाऱ्या आगींमुळे डोंबिवलीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आजच्या घटनेमुळे आता उर्वरित चार कंपन्यांचे स्थलांतर करणे अत्यावश्यक असल्याचे मत पर्यावरणप्रेमी राजू नलावडे, यांनी व्यक्त केले आहे.