ठाणे - शहापूर शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या एका गादी कारखान्याला आणि गोदामाला भीषण आग लागली. गुजराथी नगरमधील पाटील गादी कारखान्यात ही घटना घडली. या भीषण आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.
शहापूरच्या गुजराथी नगरमध्ये पाटील यांचा गादीचा कारखाना आणि गोदाम आहे. सोमवारी रात्री अचानक या कारखान्याला आग लागली. आग लागल्याचे कळताच स्थानिक ग्रामस्थांनी पाण्याचे टँकर मागवून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आगीने रुद्र रूप धारण केले होते. त्यानंतर अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी दाखल येऊन आगीवर तासाभरात नियंत्रण मिळवले.
हेही वाचा - घाटकोपरमधील 'श्रीजी' टॉवरला आग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल
या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, गादी कारखान्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात आगीच्या घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.