ठाणे - कोरोनाच्या थैमानामुळे आदिवासींच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे गेल्या महिन्याभरापासून शहरातील बाजारपेठा बंद आहेत. मात्र, या बाजारात रस्त्याच्या कडेला बसून रानमेवा विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा आदिवसी बांधव आर्थिक संकटात सापडला आहे.
विशेषतः दरवर्षी उन्हाळ्यातील मार्च-एप्रिल महिन्यात मिळणारी करवंद, जांभळं, कैऱ्या, तोरण हा दाट जंगलात मिळणारा खास रानमेवा आहे. मात्र, यावर्षी अचानक कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने हा रानमेवा विक्री करण्यासाठी दुर्गम भागातून आदिवासी बांधव शहरी भागात येऊ शकला नाही. शहापूर तालुक्यातील वासिंद, किन्हवली, डोळखांब, खर्डी, कसारा तर मुरबाड तालुक्यातील टोकावडे, माळशेज घाट परिसरात आदिवासी लोक वास्तव्य करतात. हे आदिवासी जंगलात भटकंती करुन करवंद, जांभळं, कैऱ्या, तोरणं, आदी रानमेवा गोळा करुन दरवर्षी उन्हाळ्यातील मार्च ते मे - जून महिन्यात कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुरबाड ,शहापूर भिवंडी शहरात विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र, ऊन्हाळ्यातच मिळणारा हा दुर्मीळ रानमेवा यंदा कोरोनाच्या महामारीमुळे अद्यापही शहरात विक्रीसाठी येत नसल्याने आदिवासींचा रोजगार हिरवला गेला आहे.
दरदिवशी मिळणाऱ्या ३०० रुपयांच्या कमावाईवर पाणी
रानमेवा विक्रीतून आदिवासी महिलांना दिवसभरात २०० ते ३०० रुपयांची कमाई होते. हा रानमेवा मोठ्या आवडीने ग्राहक खरेदीसाठी गर्दी करतात. १० ते २० रुपये वाटा याप्रमाणे कैऱ्या, करवंद, तोरणं, जांभळं यांची विक्री केली जाते. या रानमेव्यामुळे उन्हाळ्यात निदान दोन वेळच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटत असल्याचे या व्यवसायातील आदिवासी सांगतात. मात्र, यंदा कोरोनाच्या संकटामुळे त्यांच्या रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे.