ठाणे- दुचाकी टो केल्याच्या रागातून वाहतूक पोलीस, टोईंग कर्मचारी आणि मोठ्या संख्येने जमलेल्या व्यापाऱ्यांमध्ये तुफान हाणामारीची घटना घडली आहे. ही घटना उल्हासनगरच्या कॅम्प नंबर ५ च्या गाऊन मार्केटमध्ये घडली आहे. याप्रकरणी हल्लेखोर व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया वाहतूक पोलिसांनी सुरू केली आहे.
उल्हासनगरात मागील दहा दिवसात वाहतूक पोलीस आणि व्यापाऱ्यांमध्ये टोईंग कर्मचारी दुचाकी उचलून नेत असल्याने हाणामारीच्या तीन घटना घडल्या आहेत. आज दुपारीही वाहतूक पोलीस टोईंग गाडीसह कॅम्प नंबर ५ च्या गाऊन मार्केटच्या रस्त्यावर वाहतुकीचे नियम तोडून पार्क केलेल्या दुचाकी टो करीत होते. याच सुमाराला येथील व्यापाऱ्यांनी पोलीस आणि टोईंग कामगारांशी वाद करून गोंधळ घातला.
खळबळजनक बाब म्हणजे काही व्यापाऱ्यांनी तर टोईंग कामगाराला खाली खेचत बेदम मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी वाहतूक पोलिसाला देखील धक्कबुकी करण्यात आली. तर काही व्यापाऱ्यांनी जीवाच्या भीतीने पळून जाणाऱ्या एका टोईंग कामगाराला रस्त्यावर पाडून बेदम मारहाण केली.
हा मारहाणीचा सर्व प्रकार बघ्याच्या गर्दीने मोबाईलमध्ये कैद केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकरणी मारहाण झालेल्या वाहतूक पोलीस व टोईंग कामगारांनी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली आहे.