ठाणे - ठाण्यात तब्बल पावणेदोन कोटींचा गुटखा पकडण्यात पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागास यश आले आहे. पाच ट्रकमधून हा साठा ठाणे व मुंबई परिसरात विक्रीसाठी पाठवण्यात येत होता. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुटखा तस्करी करणाऱ्या वाहनचालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे, शासनाच्या तंबाखूजन्य पदार्थांवरील बंदी जुमानली जात नसल्याचे चित्र आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा व तत्सम पदार्थाचे सेवन, विक्री व वाहतुकीवर बंदी घातली आहे. तरीदेखील गुटख्याची विक्री छुप्या पद्धतीने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाण्यातील गायमुख घोडबंदर रोड भागातून जाणाऱ्या रस्त्यावर पाच ट्रकमधून गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार पथकाने घटनास्थळी सापळा लावून हे ट्रक पकडले. या सगळ्या वाहनांची तपासणी केली असता त्यात १ कोटी ७० लाख ४५ हजार ५९६ रुपयांचा गुटखा साठा आढळला. हा गुटखासाठा व ५० लाख रुपये किमतीची ५ वाहने अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केली आहे.
हेही वाचा - ठाण्यातील ग्लोबल रुग्णालय म्हणजे रुग्णांसाठी जीवनदान - आयुक्त डॉ. विपीन शर्मा