ठाणे - एका शेतकऱ्याच्या मुलाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेतील प्रत्येक विषयात 35 टक्के गुणांची कमाई केली आहे. सर्वच विषयात 35 टक्के गुण घेणारा तो दुसरा विद्यार्थी ठरला आहे. झयान पटेल असे विद्यार्थ्याचे नाव असून तो कल्याण तालुक्यातील वाहोली गावाचा रहिवाशी आहे.
कल्याण तालुक्यातील वाहोली गावात ए.के.जी या खाजगी उर्दू शाळेतून उर्दू माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या झयान पटेल या विद्यार्थ्याला दहावीच्या परीक्षेत प्रत्येक विषयात 35 टक्के गुण मिळाले आहेत. एकूणच त्याला मिळालेले 35 टक्के मार्क लक्षवेधी ठरले आहेत. विशेष म्हणजे झयानचे वडील शेतकरी असून घरची परिस्थिती बेताची आहे. गावापासून लांब जाने त्याला परवडत नव्हते. या गावात जाण्यासाठी बसची सुविधा देखील नाही. सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अखेर त्याने घरीच अभ्यास केला. या प्रतिकूल परिस्थितीत तो जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दहावीच्या परीक्षेला सामोरे गेला. निकालअंती त्याने सर्व विषयात 35 टक्के मार्क मिळवत तो उत्तीर्ण झाला.
याबाबत झयान याने मला 35 टक्के गुण दहावीच्या परीक्षेत मिळाले असले तरी 11 वीत प्रवेश घेऊन नीट अभ्यास करणार आणि चांगले गुण मिळवणार असा विश्वास व्यक्त केला आहे. झयानचा भाऊ अजहर याने सरकारने वाहोली गावात शैक्षणिक सोयी-सुविधा पुरवल्यास उर्दू माध्यमातील विद्यार्थी देखील दहावीच्या परीक्षेत चांगल्या मार्कानी यश मिळवू शकतात याकडे लक्ष वेधले.