ठाणे: भिवंडी तालुक्यात कंपनीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या टेम्पोमध्ये भलामोठा अजगर सापडला. (Eight feet long python). ही घटना तालुक्यातील मुंबई नाशिक महार्गावरील गोदरेज कंपनीत घडली. माहिती मिळताच सर्पमित्रांनी वन विभागाच्या मदतीने आठ फुटाच्या या अजगराला अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर टेम्पोमधून पकडले आणि त्यानंतर पडघा वन अधिकाऱ्यांच्या परवानगीने त्याला जंगलात सोडले. (snakes in bhiwandi).
यापूर्वी अजगराच्या दोन घटना: भिवंडी तालुक्यात गेल्या महिन्यात परतीचा मुसळधार पाऊस बरसल्याने ग्रामीण भागातील सखल जंगलात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. २० दिवसापूर्वी तालुक्यातील पोगाव फाटा तेथील एका झाडावरून ८ फुटाचा अजगर पकडून त्याला सर्पमित्र व अग्निशमन दलाच्या जवानांनी जंगलात सोडले होते. त्यानंतर पुन्हा भिवंडी तालुक्यातच कुकसे गावातील शेतात एक भलामोठा अजगर वेटोळ्या मारून बसल्याचे नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या गावकऱ्याला दिसला होता. त्यावेळी त्यावेळी सर्पमित्र अशोक जाधव व त्याच्या सोबत काही तरुण सर्पमित्रांनी वन पथकाच्या साथीने या अजगराला पकडले होते. हा अजगर साडे आठ फुटाचा होता.
तीसरी घटना: दोन घटना घडल्यानंतर तिसऱ्या घटनेतही भलामोठा अजगर गोदरेज कंपनीच्या पार्किंगमधून घुसला होता. अजगर कंपनीत शिरल्याची माहिती सुपरवायझर संजय शेलार यांनी सर्पमित्र आकाश जाधव याला काल सायंकाळच्या सुमारास दिली. माहिती मिळताच सर्पमित्र आकाश यांनी वन विभागाच्या मदतीने आठ फुटाच्या अजगराला टेम्पोमधून पकडले. त्यानंतर पडघा वन अधिकाऱ्यांच्या परवानगीने त्याला जंगलात सोडण्यात आले. भिवंडी तालुक्यात २० दिवसात तीन भलेमोठे अजगर पकडण्यात आल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.