ठाणे: यामध्ये महाविकास आघाडीचे बाळाराम दत्तात्रेय पाटील, आणि भाजप शिंदे गटाचे ज्ञानेश्वर बारकु म्हात्रे, यांच्यात 'कांटे की टक्कर' होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोकण विभाग शिक्षक मतदार संघात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग हे पाच जिल्हे समाविष्ट आहेत. मतदान हे मतपत्रिकेवर होणार आहे. त्यावर उमेदवाराच्या नावासमोर असलेल्या पसंतीक्रमाच्या रकान्यातच मतदारांनी पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक आहे.
मतदान प्रक्रिया निर्भय व मुक्त वातावरणात: कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणूकीची मतदान प्रक्रिया निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्याकरीता मतदानाच्या दिवशी सर्व मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षक यांची नियुक्ती केली आहे. तसेच व्हिडीओग्राफी व वेबकास्टींग करण्यात येणार आहे. शिक्षक मतदारसंघाची निवडणूकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र व्यतिरिक्त खाली नमूद पर्यायी केलेले कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत आयोगाने आदेश दिले आहेत.
हे पर्यायी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य: आधारकार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, भारतीय पारपत्र, केंद्र राज्य सरकार सार्वजनिक उपक्रम पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले फोटोसह सेवा ओळखपत्र, संबधित शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील मतदार ज्या शैक्षणिक संस्थेत काम किंवा नोकरी करीत आहेत, त्या शैक्षणिक संस्थानी जारी केलेले शैक्षणिक संस्थानी जारी केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापीठाद्वारे वितरीत मूळ पदवी किंवा पदविका प्रमाणत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले शारिरीक दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र, अशी कागदपत्रे पर्यायी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतील. अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोकण विभागाचे उपायुक्त (सामान्य) मनोज रानडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
मतपेट्या पोलीस बंदोबस्तासह जिल्हा मुख्यालयात: मतदान संपल्यावर मतदान अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यामार्फत सर्व मतपेट्या पोलीस बंदोबस्तासह जिल्हा मुख्यालय येथे एकत्रित करण्यात येणार आहे. जिल्ह्यांतून आगरी कोळी संस्कृती भवन, सेक्टर-24, पामबीच रोड, नेरुळ (पश्चिम), नवी मुंबई येथील मतमोजणीच्या ठिकाणी स्ट्राँग रुममध्ये जमा करण्यात येणार आहेत. मतमोजणी गुरुवार सकाळी 8.00 वाजल्यापासून सुरु होणार असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.