ठाणे - दहावीत सतत 10 वर्षे मराठी-हिंदी विषयात नापास होत असल्याने मित्राच्या मदतीने पास होण्यासाठी मित्रालाच पेपरला बसवल्याचा प्रकार उघड झाला आहे. एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाला पैशांसह नोकरीचे आमिष दाखवून त्याला दहावीचा पेपर सोडविण्यासाठी बसविल्याचे उघड झाल्याने 'मुन्ना भाई एमबीबीएस' या चित्रपटाची आठवण झाली आहे.
सागर लक्ष्मीराजन विजया कटला (वय, 21 रा.गणेश टॉकीज ,पद्मानगर भिवंडी) असे तोतया परीक्षार्थीचे नाव आहे. तर जगन्नाथ शंकर मुल्या (रा. गायत्रीनगर, भिवंडी ) असे मूळ विद्यार्थ्याचे नाव असून चरण देवासानी असे त्याला मदत करणाऱ्या मित्राचे नाव आहे. नारपोली पोलिसांनी तोतयासह मूळ परीक्षार्थी व त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, भिवंडीतील धामणकर नाका येथील शेठ ज्युगिलाल पोद्दार इंग्लिश मीडियम शाळेत दहावी परीक्षेचे केंद्र आहे. येथे आरोपी जगन्नाथ शंकर मुल्या हा पुनः परीक्षा देत होता. या विद्यार्थ्याचा आसन क्रमांक एओ 4314 असा आहे. तो 2010 च्या बॅचचा शेठ ज्युगिलाल पोद्दार शाळेचाच विद्यार्थी आहे. मागील 10 वर्षात प्रयत्न करूनही मराठी व हिंदी विषयात तो पास होऊ न शकल्याने मार्च 2020 च्या परीक्षेसाठी त्याने पुन्हा प्रवेश घेतला होता. यावेळी त्याला कोणत्याही परिस्थितीत पास व्हायचे, या उद्देशाने त्याने आपला मित्र चरण देवासानी याच्याकडे सल्ला मागितला.
हेही वाचा - 'कोरोना'मुळे रंगाचा बेरंग, चीनमधील रंगांवर 'संक्रात'
त्यावेळी मुन्ना भाई एमबीबीएस या चित्रपटाच्या एका दृश्याप्रमाणे शक्कल लढवत त्याने डमी विद्यार्थी बसविण्याचा सल्ला दिला. त्यांनतर आरोपी सागर कटला या एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधत परीक्षा देण्याच्या बदल्यात पैसे व बंगळुरू येथे कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दिले. त्यानंतर कटला हाही परीक्षा देण्यासाठी तयार झाला.
सागर कटला याने तोतया विद्यार्थी बनून 4 मार्च रोजी मराठी विषयाची परीक्षा दिली. त्यानंतर 6 मार्च रोजी हिंदी विषयाची परीक्षा देत असताना कुणाल चौधरी या शिक्षकाने मूळ विद्यार्थी याने तोंडी परीक्षा दिली नसल्याने ते मूळ विद्यार्थी जगन्नाथ शंकर मुल्या या विद्यार्थ्याकडे चौकशी करण्यासाठी परीक्षा केंद्रातील वर्ग खोलीत आले. त्यावेळी त्यांना सदर परिक्षार्थीच्या जागेवर तोतया विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याचे परीक्षा ओळखपत्र तपासत असताना ते बनावट बनविल्याचे आढळून आल्यावर त्यांनी ही बाब परीक्षा केंद्रप्रमुख संभाजी सावंत यांच्या लक्षात आणून दिली.
परीक्षा केंद्र प्रमुखांनी नारपोली पोलिसांना पाचारण करून तोतया विद्यार्थ्या विरोधात तक्रार दिली. दरम्यान, नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक एम. यु. कारवार हे तपास करत असताना मुळ परीक्षार्थी जगन्नाथ शंकर मुल्या व त्याचा साथीदार चरण देवासानी यांनी प्रत्येक विषयाच्या परीक्षेसाठी 500 रुपये व नोकरी लावून देण्याचे आमिष दिले असल्याचे समोर आले. त्यानुसार मराठी विषयाची परीक्षा डमी विद्यार्थ्याने दिल्याचे कबुल केले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक एम. यु. कारवार यांनी पहाटेच्या सुमारास मुळ परीक्षार्थी जगन्नाथ शंकर मुल्या व त्याचा साथीदार चरण देवासानी यांना पद्मानगर येथून ताब्यात घेतले. नारपोली पोलिसांनी या तिन्ही आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले असता, 11 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.