ठाणे - खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुरबाड येथील प्रचार सभेला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार कोकण पट्ट्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली होती. यावेळी सुप्रिया सुळेंनी भरपावसात भाषण करत ही सभा आटोपती घेतली.
मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रमोद हिंदुराव यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रिया सुळे यांनी जाहीर सभेत पावसावर मार्मिक भाष्य करत भर सभेत पाऊस पडतो, म्हणजे आपल्याला शुभ शकुन आहे, आपला उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होणार असे दोन शब्द बोलून त्या पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाल्या.
हेही वाचा - हम क्या चाहते...आझादी..! कन्हैय्या कुमारच्या आझादीच्या घोषणांवर मुंब्र्यातील युवकांना धरला ताल
विशेष म्हणजे आठदिवसापासून सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेसाठी मुरबाड मधील आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तयारी सुरु केली. मात्र, स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी सभेसाठी पाहिजे असलेल्या मैदानाची परवानगी नाकारली होती. त्यांनतर ऐनवेळी परवानगी दिली. त्यांनतर सुप्रिया सुळे हेलिकॉप्टरने येणार होत्या. मात्र, अचानक हॅलिकॉप्टर उतरवण्यास परवानगी न दिल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांमध्ये निवडणूक प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात होता. सभेची वेळ निघून गेली तरीही मोठ्या प्रमाणात सभा मंडपात आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यातच सभा सुरू झाली आणि सुप्रिया सुळेंचे मुसळधार पावसात सभास्थळी आगमन झाले. मात्र, वरूनराजाने जोरदार बरसात केल्याने शेकडो कार्यकत्यांनी मंडपातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तर काही कार्यकर्ते मुसळधार पावसातही डोक्यावर खुर्च्या घेऊन सुळे यांना ऐकण्यासाठी सभा मंडपात थांबुन राहिले होते.
हेही वाचा - डोक्यात हवा जाऊ देऊ नका, उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना सल्ला