ठाणे - अंबरनाथमधील महावितरणद्वारे ग्राहकांच्या वीज मीटरची रिडिंग घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या एजन्सीचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. अंबरनाथ पूर्व भागातील कानसई परिसरात एका इमारतीतील कुत्र्याच्या भीतीमुळे रिडींग न झाल्यास आमची जबाबदारी नाही असा संदेशच एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी वीज मीटरच्या बॉक्सवर लिहून ठेवल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.
हेही वाचा - भिवंडीत बांधकाम निष्कासन कारवाई विरोधात भूमिपुत्रांचा रास्ता रोको
वीज ग्राहकांच्या वीज मीटरचे रिडींग घेण्याचे काम महावितरणकडून एका एजन्सीला देण्यात आले आहे. परंतु वीज बिलाची रिडींग घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून कामचुकारपणा करण्याच्या शेकडो तक्रारी समोर येत होत्या. त्यामुळे वर्षभरात दोन ते तीन वेळा एजन्सीला दंड आकारत त्यांचे काम थांबवण्याची वेळ आली होती.
अंबरनाथ पूर्व भागातील कानसई परिसरातील भीमनगर येथील मनिषा अपार्टमेंट या इमारतीतील वीज मीटरची रिडींग घेण्यासाठी मंगळवारी काही एजन्सीचे कर्मचारी गेले होते. मात्र, त्याठिकाणी रिडींग न घेताच हे कर्मचारी निघून गेले असल्याचे बोलले जात आहे. इमारतीतील काही रहिवाशांनी सोसायटी मधील मीटर बॉक्स बघितला असता त्यांना धक्काच बसला. सोसायटी मधील वीज मीटरच्या बॉक्सवर महावितरण "कुत्र्यांच्या भितीमुळे रिडींग न घेतल्यास आम्ही जबाबदार नाही" असा संदेश लिहून ठेवण्यात आला होता. यामुळे सोसायटीमधील रहिवासी संतप्त झाले आहेत.
हेही वाचा - महिलेचे मंगळसूत्र लांबविणाऱ्या चोराला नागरिकांनी दिला चोप
सोसायटीमध्ये एक भटका कुत्रा आहे. मात्र, त्याचा कोणालाही त्रास नाही. आमच्याकडे अनेक लोक येत असतात तसेच दर महिन्याला महावितरणकडून रीडिंग ही घेतले जाते, तेव्हा कधी कोणाला त्रास झाला नाही. जर आम्हाला पुढील महिन्यात बिल आले नाही, आणि महावितरणने वीज पुरवठा खंडीत केला, तर याला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी विचारला आहे. सोसायटीत रहिवाशांना कळावे म्हणून असे लिहले, असे मीटर रीडिंग घेणाऱ्या एजन्सीच्या कर्मचाऱ्याने सांगितले.
हेही वाचा - मुलाच्या वाढदिवसावरून वाद; पत्नीने पतीच्या डोक्यात फ्राय पॅन मारून सुरीने केले वार
दरम्यान, एखाद्या इमारतीच्या आवारात कुत्रा बांधून ठेवला असला तरी त्या इमारतीतील नागरीकांना कळवणे तसेच याबाबत महावितरणच्या अभियंत्यांना कल्पना देणे वीज मीटरची रिडींग घेणाऱ्या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांचे काम आहे. मात्र, मीटरमधून रिडींग न घेताच परस्पर ग्राहकांना अंदाजे बिल देण्याचे प्रकार संबंधित एजन्सीकडून करण्यात येत आहेत. आज या सोसायटी मधील १० सदनिका धारकांना महावितरणच्या या भोंगळ कारभारचा फटका बसणार आहे.