ठाणे - भर बाजारात आज (30 जानवेवारी) दुपारी दीड वाजताच्या सुमारास वाहतूक पोलिसांच्या टोईंग व्हॅनवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना कल्याण पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य बाजारपेठेत घडली. अपघातात ९ दुचाकी, चारचाकी वाहन व रिक्षा, या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच एक पादचारी जखमी झाला आहे.
कल्याण पश्चिमेकडील वाहतूक शाखेच्या कार्यालयाशेजारी राजेंद्र ज्वेलर्स नावाने दुकान आहे. या दुकानासमोर रस्त्यावर काही दुचाकी, रिक्षा,चारचाकी वाहने पार्क केलेली होती. त्यावेळी बेकायदेशीरपणे उभ्या असलेल्या दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस टोईंग व्हॅन घेऊन आले होते. अचानक या टोईंग व्हॅनवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने व्हॅन राजेंद्र ज्वेलर्स समोरील गाड्यांवर गेली.
हेही वाचा - दिव्यातील फूटपाथ फेरीवाल्यांना आंदण? वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
दरम्यान, टोईंग व्हॅन चालकाला चक्कर आल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. सुनिल जाधव, असे व्हॅन चालकाचे नाव आहे. त्यांना महात्मा फुले चौक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच घटनास्थळाचा पंचनामादेखील करण्यात आला आहे.