ठाणे - अंबरनाथ शहरात भटक्या श्वानांनी नागरिकांसह लहान मुलांवर हल्ले सुरू केले असून अशाच एका घटनेत चिमुकल्यावर भटक्या श्वानांनी हल्ला केल्याची घटना समोर आहे. विशेष म्हणजे त्या चिमुकल्यावर भटक्या श्वानांनी अचानक हल्ला करतानाचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सुमेध लोहार (वय 4 वर्षे), असे भटक्या श्वानांच्या हल्यात जखमी झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
तीन ते चार श्वानांनी केला त्याच्यावर हल्ला
अंबरनाथ शहरात शंकर हाईट फेस टू या इमारतीमध्ये सुमेध लोहार हा चार वर्षाचा चिमुकला आपल्या आई-वडिलांसह राहतो. सुमेध हा इमारतीच्या आवारात रविवारी (दि. 21 मार्च) सकाळच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत खेळत होता. त्यावेळी आवारातच 4 ते 5 भटके श्वान फिरत होते. त्यावेळी सुमेधने एका श्वानाला हुसकवण्याचा प्रयत्न केला असता, त्या श्वानासह तीन ते चार श्वानांनी त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तो जखमी झाला आहे.
सुदैवाने चिमुकल्याचा वाचला जीव
सुदैवाने इमारतीमधील स्थानिक रहिवाशांनी हल्लेखोर भटक्या श्वानांना हुसकावून लावल्याने या चिमुकल्याचा जीव वाचला. मात्र, भटक्या श्वानांच्या हल्ल्यात सुमेधच्या पाठीवर जखम झाली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा भटक्या श्वानांची दहशत अंबरनाथमध्ये पाहवयास मिळाली आहे. आता या घटनेनंतर अंबरनाथ नगरपरिषदेने शहरातील भटक्या श्वानांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून पुढे आली आहे.
हेही वाचा - धक्कादायक ! प्रियकराने प्रेयसीच्या आईची गळा चिरून केली हत्या, गुन्ह्यात प्रेयसीही सामील