ठाणे : दिवा शहरातील शिवसेना नेत्यांच्या वतीने आयोजित पाईपलाईन लोकार्पण सोहळ्याच्या निषेधार्थ दिवा भाजपच्या नेत्यांनी रेल्वे स्टेशन येथे निदर्शने करत लोकांना पाण्यासाठी रिकामे कॅन व बादलीचे वाटप केले. मुख्य जलवाहिनीच्या कामांमध्ये व शहरासाठी आलेल्या 800 कोटींच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात गैर व्यवहार झाल्याचा आरोप यावेळी भाजप नेत्यांनी केला. तसेच या प्रकरणी दिवा शिवसेनेच्या नेत्यांची चौकशी व्हावी, अशी मागणीही भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
आठ दिवसांपासून पाणी टंचाई : मुख्यमंत्री नव्या पाईपलाईनच्या लोकार्पणासाठी दिव्यात येत असतानाच काल रात्री मुख्य पाईपलाईन लिकेज झाले होते. यामुळे गेले आठ दिवस दिव्यात तीव्र पाणी टंचाई आहे. या पार्श्वभूमीवर दिवा भाजपच्या नेत्यांनी स्थानिक शिवसेना नेत्यांच्या कारभारा विरोधात मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी दिवा स्टेशन येथे निदर्शने केली. यावेळी दिवा मंडळातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तीन किलोमीटर रस्त्याला लागले सहा वर्षे : दिवा शहरात तीन किलोमीटरच्या रस्ता बनवण्यासाठी सहा वर्ष लागली. शेकडो कोटींच्या खर्चातून बांधण्यात येणाऱ्या अशा कामाचा दिवेकरांना खरंच फायदा होणार आहे का? सहा वर्ष दिवा वासियांनी खूप त्रास भोगावा लागला, अशा प्रकारे नाराजी व्यक्त करत भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी पालिका प्रशासनाचा देखील निषेध केला.
एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण : दुसरीकडे दिवा शहर व परिसरात होणाऱ्या विविध विकास कामाचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, 'मी राज्याचा मुख्यमंत्री असलो तरी काल, आज आणि उद्याही मी कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार आहे. 50 आमदार आणि 13 खासदारांनी व राज्यांतील लाखो कार्यकर्त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही.'
हे ही वाचा :