ठाणे - सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या छायाचित्रांचा वापर करून सोशल मीडियात बदनामीकारक मजकूर प्रसारीत केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात कासारवडवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विनोदी अभिनेता मकरंद अनासपुरे यांचे अनेक चाहते आहेत. अनेकजण त्यांना व्हॉट्सअॅपद्वारे फॉलो करतात. तर मागील वर्षभरापासून त्यांच्या छायाचित्राशी छेडछाड करून सोशल मीडियात वादग्रस्त पोस्ट प्रसारित केले जात आहेत. मात्र, या मजकूरांशी काहीच संबंध नसल्यामुळे तसेच ते विनोदी मजकूर असल्यामुळे अनासपुरे यांनी त्याकडे गांभीर्यपूर्वक पाहिले नाही.
परंतु, मार्च ते जुलै २०१९ या कालावधीत राजकीय स्वरुपाचा तसेच समाजामध्ये अनासपुरे यांच्याबद्दल गैरसमज आणि तिरस्कार निर्माण करणारा एक पोस्ट प्रसारीत करण्यात आल्याची बाब अनासपुरे यांच्या निर्दशानास आली. त्यानंतर त्यांनी यासंदर्भात कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अनासपुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कासारवाडी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.