ठाणे - दिवाळीच्या निमित्ताने सध्या घराघरात खुसखुशीत चकली, शंकरपाळे, चिवडा, शेवय्या, लाडू आणि करंजी फराळाचा घमघमाट पसरला आहे. कधी एकदाची दिवाळी पहाट उजाडते आणि फराळाच्या ताटावर ताव मारायचा, अशी काहीशी अवस्था जवळपास सर्वच खवय्यांची झाली आहे. त्यात गैर काहीच नाही. मात्र, तरीही सावधानता बाळगणे फार आवश्यक आहे. विशेषत: कोरोना होऊन गेलेल्या नागरिकांनी यंदा फराळासाठी आखडता हात घेत वायू प्रदूषणासोबतच आहाराबाबतही जागरुक राहणे योग्य असल्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.
दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव आणि फराळाची रेलचेल. हिवाळ्याची चाहूल लागत असतानाच येणारा हा वर्षातला सर्वात मोठा सण. त्यामुळे हिवाळ्यात शरीराला भरपूर उर्जा मिळावी यासाठी पूर्वजांनी हा फराळाचा घाट घातला. फराळामध्ये वापरले जाणारे तूप, साखर, डाळी, सुकामेवा हे मधूर, बुद्धीवर्धक, धातूवर्धक, वातनाशक आणि शीत असतात. हिवाळ्यात भूक वाढते आणि पचनसंस्थाही उत्तम असते. त्यामुळे फराळ सहज पचतात. मात्र, आता बदलत्या जीवनशैलीनुसार एकेकाळी उर्जा देणारे हे फराळ आता खाणप्रदूषणाचे कारण ठरत असल्याचे समोर आले आहे. फराळ रुचकर व्हावा यासाठी मैदा, तेल, तुप आणि साखरेचा भडीमार होऊ लागला असून त्यामुळे वजन वाढणे, मधूमेह, कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्याच्या तक्रारी गेल्या काही वर्षांमध्ये येऊ लागल्या असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
मागील दोन वर्षांपासून आजारात नवीन अशा कोरोनाची भर पडली आहे. ज्या नागरिकांना कोरोना होऊन गेला आहे, अशांना मधुमेहाचा धोका जास्त असल्याने त्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - विशेष : दिवाळीत आरोग्याची काळजी कशी घ्याल?
खाण प्रदूषण म्हणजे काय?
दिवाळीत फटाक्यांमुळे वायू, ध्वनी प्रदूषण वाढते. तसेच फराळाच्या अतिसेवनामुळे शरीरात खाणप्रदूषण वाढते, असे आहारतज्ज्ञ डॉ. शितल म्हामुणकर यांनी सांगितले. खाण प्रदूषण म्हणजे एखादा पदार्थ खाल्यामुळे आपल्या शरीरावर ज्याचा परिणाम होतो, दिसतो ते. दिवाळीत विविध प्रकारचे फराळ आपण खातो. यामध्ये साखर, मीठ, तेलाचे प्रमाण जास्त असते. पूर्वीच्या काळी आपली शारीरिक हालचाल जास्त असायची, थंडी जास्त पडायची. त्यामुळे हा फराळ पचायचा. पण आता सवयी बदलल्या आहेत. व्यायाम सोडाच पण शरीराची हालचालही अनेकांची मंदावली आहे. लॉकडाऊनच्या काळात शरीराची सवय बनली आहे. त्यामुळे फराळाच्या माध्यमातून जास्त प्रमाणात उर्जा जाते. मात्र, त्या तुलनेत शरीराची हालचाल न झाल्याने या उर्जेचे रुपांतर चर्बीत होते. अर्थात वजन वाढले की मधूमेह, रक्तदाब, संधीवात या आजारांचा धोका वाढतो, असे डॉ. म्हामुणकर यांनी सांगितले.
मनसोक्त व्यायाम करा -
दिवाळी रोज येत नाही म्हणत आपण फराळावर ताव मारतो. तसे करायला हरकतही नाही. पण फराळ खाताना काही पथ्य पाळले पाहिजे. एक म्हणजे भरपूर व्यायाम करा. जमेल तितके चाला, शरीराची हालचाल ठेवा. दुसरे म्हणजे फराळ खात असाल तर एखाद्या वेळचे जेवण टाळा. म्हणजे कॅलरीज प्रमाण राखता येईल. तसेच ओवा, जीरे आणि आळशीची पूड करून ती सेवन केल्यास लाभदायक ठरेल, असेही आहार तज्ञ सांगतात.